Sanjay Raut : कट्टर विरोधक संजय राऊतांसाठी नितेश राणेंचं ट्वीट, पाच शब्दांत व्यक्त केली चिंता!
भाजपाचे नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सोबतच लवकर बरे व्हा, अशा भावनाही राणे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Sanjay Raut Health : ठाकरे गटाचे नेते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत. त्यांच्यावर अद्याप कोणत्या आजारावर उपचार चालू आहेत, हे समजू शकलेले नाही. मात्र खुद्द संजय राऊत यांनीच माझी प्रकृती बरी नसल्याची माहिती दिली आहे. राऊतांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठीही प्रार्थना केली. दरम्यान, राऊत यांच्यावर नेहमी टीका करणारे भाजपाचे नेते तथा मंत्री नितेश राणे यांनीही राऊतांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाच शब्दांची एक पोस्ट लिहून त्यांनी राऊतांना काळजी घेण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.
नितेश राणे यांचे ट्वीट, काळजी घेण्याचे आवाहन
संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच नितेश राणे यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राऊतांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. संजय राऊतजी काळजी घ्या, असे म्हणत लवकर बरे व्हावा, अशी प्रार्थनाही केली आहे. नितेश राणे भाजपाचे नेते आहेत. ते नेहमीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच ठाकरे कुटुंबावर सडकून टीका करतात. कधी-कधी ते संजय राऊतांवर बरसलेले पाहायला मिळालेले आहे. विशेष म्हणजे नितेश राणेंच्या टीकेला संजय राऊत यांनीदेखील तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिलेले आहे. राजकीय मैदानात हे दोन्ही नेते एकमेकांचा कट्टर विरोधक आहेत. परंतु राऊतांची प्रकृती बरी नसल्याचे समजताच राजकीय मतभेद राजकीय आखाड्यापुरतेच मर्यादित ठेवून नितेश राणे यांनी राऊतांविषयी काळजी घ्यावी आणि लवकर बरे व्हावे अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
संजय राऊत यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे?
संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबर रोजी आपल्या एक्स खात्यावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आजाराविषयी भाष्य केले होते. सध्या अचानक माझ्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. माझ्यावर उपचार सुरू आहेत. मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे, असे राऊतांनी आपल्या पत्रात सांगितले होते. तसेच मी यातून लवकरच ठणठणीत बरा होऊन नव्या वर्षात तुमच्या भेटीला येईल, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.
.@rautsanjay61 जी..
काळजी घ्या
लवकर बरे व्हा!
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 1, 2025
दरम्यान, राऊतांची प्रकृती बरी नसल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच संजय राऊत लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थनाही केली.
