‘संजय राऊत यांची बराक मोकळी तुम्हालाही…’, भाजप आमदाराचा राष्ट्रवादीच्या नेत्याला इशारा
संजय राऊत यांची बराक सध्या मोकळी आहे. माझा हिशोब काढू नका मी तुमचा हिशोब काढला तर ते भारी पडेल. माझ्यावर आरोप कराल तर त्या मोकळ्या बराकमध्ये तुम्हाला जावे लागेल. असा इशारा भाजप आमदारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलाय. काही दिवांपासून या दोन्ही नेत्यामध्ये आरोप, प्रत्यारोप होत आहेत.

सातारा : 9 ऑक्टोबर 2023 | माझ्या गाडीचा आणि पैशांचा हिशोब काढून नादाला लागू नका. शरद पवार यांनी माझी 5 वेळा चौकशी केली होती. त्यांच्या हाताला काय लागलं ते त्यांना विचारा. पण, ज्यावेळेस मी तुमचा हिशोब काढेन त्यावेळेस संजय राऊत यांची बराक मोकळी आहे त्या ठिकाणी तुम्हाला जावे लागेल, असा इशारा भाजप आमदारांनी राष्ट्रवादीच्या नेत्याला दिलाय. राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजप आमदारांकडे दोन महिन्याला नव्या गाड्या कुठून येतात असा सवाल केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना आमदारांनी हा इशारा दिलाय.
सातारा जिल्ह्यातील मान खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्यात काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केलीय.
आमदार जयकुमार गोरे हे सातत्याने शरद पवार यांना एकेरी भाषेत बोलतात. शरद पवारांचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही आदराने शरद पवारांबाबत बोलत असतात. मात्र, आमदार जयकुमार गोरे हे एकेरी भाषेत उल्लेख करतात. त्यांची पात्रता काय आहे याचे भान ठेवण्याची त्यांना गरज आहे, अशी टीका प्रभाकर देशमुख यांनी केली.
आमदार जयकुमार गोरे हे कायम माझ्या प्रॉपर्टीबद्दल बोलत असतात. याविषयी कोर्टानेही सांगितलेलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या आरोपात काही तथ्य नसल्याचा खुलासा केलाय. तरी देखील आमदार टीका करत आहेत. परंतु, आमदारांच्या दोन महिन्याला बदलण्यात येणाऱ्या गाड्या कुठून येतात हे जनतेला समजू द्या. त्यांनी नेमका कोणता मोठा व्यवसाय सुरू केला हे देखील लोकांना समजू द्या, असा टोलाही प्रभाकर देशमुख यांनी लगावला होता.
आमदार जयकुमार गोरे यांनी एका स्थानिक बैठकीत राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. माझ्या गाडीचा हिशोब काढू नका मी तुमचा हिशोब काढला तर मायणीच्या देशमुखांच्या शेजारी तुरुंगात बसावं लागेल, असा इशारा दिला. मायणी येथील मेडिकल कॉलेजचे देशमुख ज्या ठिकाणी आहेत त्याच्या शेजारची संजय राऊत यांची बराक मोकळी आहे. त्या ठिकाणी जसे मायनीचे देशमुख तुरुंगात गेलेत तसे लोधवडे गावचे देशमुख तुरुंगात जायला वेळ लागणार नाही, असे आमदार जयकुमार गोरे म्हणाले.
