मतांची चोरी करून सत्तेत बसलेत, पण आता सत्ता…, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विदर्भ आणि मुंबईतील भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विदर्भ आणि मुंबईतील भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री या निवास्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केलं आणि भाजपवरही सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, सर्वांचे मातोश्री आणि शिवसेनेमध्ये स्वागत. कालचा दिवस देशाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा होता. आपण सगळे देशात जे चाललं आहे ते पाहत आहोत. भ्रष्टाचार उघडपणाने चालला आहे जसं की महाराष्ट्रात बेबंदशाही आहे. कोणी कोणाला विचारायला बघतच नाही आहे. मी काल देखील म्हणालो होतो, आज देखील म्हणत आहे उद्या देखील म्हणेल. भ्रष्टाचार वाल्यांवर कारवाई होत नाही. कोणाला काहीच फरक पडत नाही.’
मतांची चोरी करुन भाजप सत्तेत…
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘काल जे दिल्ली मध्ये घडलं, 300 खासदारांना अटक करण्यात आली. मतांची चोरी करून सत्तेत बसले आहे. ती चोरी आता पकडली गेली आहे. याबाबत जाब विचारला जात होता, मात्र त्यांना जाऊ दिलं नाही. एक एक करुन आपल्या डोळ्यावरच्या पट्ट्या निघत आहेत. आता यांची सत्ता जायची वेळ आलेली आहे. यांची नाटकं लोकं ओळखत आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई होत नाही
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, दोन-तीन वर्षांपूर्वी शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी दिल्लीत जात होते. त्यांच्या मार्गात खिळे पसरले गेले, मोठे बॅरिकेट्स टाकले. आता जनतेने निवडून दिलेल्या खासदारांनी प्रश्न विचारायचे नाहीत. मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी बाहेर काढले तरी कारवाई होत नाही. किती दिवस सहन करायचं हे? एकंदरीतच हे थापा मारून आलेलं सरकार आहे, राज्यातही तसंच आहे. तुम्ही शिवसेनेत आले आहात, तुमचं कौतुक आहे. जनतेच्या लढ्यासाठी काम करु. सत्तेच्या नादी लागून अनेकजण तिकडे गेले मात्र ते कपाळाला हात लावून बसले आहेत. कारण आता भाजपची सत्ता जाण्याच्या मार्गावर आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
