महापौर पदाचा वाद… भाजपमध्येच मतभेद? माजी खासदाराने थेट लोढांनाच फटकारलं, नेमकं प्रकरण काय?
BMC Election : मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मात्र मुंबईत भाजपचा महापौर असेल असं विधान केले आहे. मात्र आता यावरून भाजपमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता आगामी काळात मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आता मुंबईत महापौर कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. महायुतीतील नेते मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल असा दावा केला आहे. तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मात्र मुंबईत भाजपचा महापौर असेल असं विधान केले आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता यावरून भाजपमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे. कारण आता माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोढा यांना फटकारलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुंबईत भाजपचा महापौर – मंत्री लोढा
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की, ‘मुंबई महानगर पालिकेत जेव्हा भाजपचा महापौर बनेल, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याच्या शपथविधीसाठी महापालिकेत जातील, त्यावेळी तुमची आणि माझी कॉलर टाईट टाईट होईल. भाजप हा पक्षा देवाभाऊंचा आहे, राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर चालतात.’
किरीट सोमय्यांनी लोढांना फटकारलं
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना याबाबत विचारणा करण्यात आली होती. यावर बोलताना सोमय्या म्हणाले की, महापौरसाठी भाजप लढत नाहीये. जे नेते महापौर महापौर पद म्हणत आहे त्यांना मी सांगितलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगितल आहे की त्यांना आवरा. कसली कॉलर टाइट, कसलं महापोर पद. आमच्या डोळ्यासमोर मुंबई आहे कोविडच्या काळात ठाकरे सेना कमाई करत होती. खिचडी, रेमडेसिवर घोटाळा झाला. आम्हाला महापालिका भ्रष्टाचारापासून मुक्त करायची आहे. मुंबईचा विकास करणे हे आमचे लक्ष आहे. त्यामुळे महापौर पद आणि कॉलर टाइटचा प्रश्नच नाही. देवेंद्र फडणवीस असो किंवा नरेंद्र मोदी, मुंबई जे पंचवीस वर्षात ठाकरे सेनेने लुटली आहे त्या मुंबईचा विकास आम्ही करणार आहोत.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणला आहे आणि याबाबत आता मुलुंड पोलिसांनी देखील दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील कुर्ला येथील उर्दू महानगरपालिका शाळेमध्ये शाळेच्या दाखल्या संदर्भात नावामध्ये देखील तफावत आढळल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे कुर्क्यामध्ये शिधावाटप कार्यालयात देखील शिधापत्रिका मध्ये अधिकची नावे चढवल्याचा प्रकार समोर आलेला आहे. असे अनेक डॉक्टर आहेत त्यांनी बनावट जन्म प्रमाणपत्र दाखला दिला असल्याचे कागदी पुरावे समोर आले आहे. यामुळे बांगलादेशी घुसखोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं चित्र समोर आल आहे.
