Maharashtra Election News LIVE : पुणे : शीतल तेजवाणीला 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

BMC, Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या विभागात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकतात.

Maharashtra Election News LIVE : पुणे : शीतल तेजवाणीला 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी
News LIVE Updates
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Dec 23, 2025 | 6:56 PM

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. मात्र, प्रमुख पक्षांच्या युती किंवा आघाडीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने पहिल्या दिवशी या पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता धूसर आहे. नगरपालिकेत स्वबळ आजमावल्यानंतर महानगर-पालिकांमध्ये युतीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत, तर मनसेशी जागावाटपाची चर्चा करत असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने आता काँग्रेसशी हातमिळवणी करण्यासाठी दिल्लीशी संपर्क साधला आहे. नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निकालांचे पडसाद महानगरपालिका निवडणुकीत उमटण्याची शक्यता वर्तविली जाते. भाजप आणि महायुतीने विजय संपादन केल्याने त्याचा शहरांमध्ये नक्कीच मतदारांवर प्रभाव पडू शकतो. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Dec 2025 06:55 PM (IST)

    पुणे : भोर नगरपालिका निवडणुकीतील विजयी नगरसेवकांनी घेतली अजित पवारांची भेट

    पुण्यातील भोर नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

  • 23 Dec 2025 06:40 PM (IST)

    बुलढाणा : शेलगाव देशमुख ते डोणगाव रस्ता खड्डामय, प्रवाशांचे हाल

    मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख ते डोणगाव रस्ता खड्डामय झाला असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यावरून वाहनधारकांना प्रवास करताना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

  • 23 Dec 2025 06:25 PM (IST)

    धाराशिव : शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन

    धाराशिव जिल्ह्यातील पाचशे ते सहाशे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे 14 ते 15 कोटी रुपये आडत दुकानदाराकडून न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. आत्महत्या केलेल्या दुकानदाराची मालमत्ता विकून शेतमालाचे पैसे द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

  • 23 Dec 2025 06:15 PM (IST)

    पुणे : शीतल तेजवाणीला 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

    पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी बावधन पोलिसांच्या ताब्यात आहे. बावधन पोलिसांकडून शीतल तेजवानीची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. काल अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद झालेल्या आरोप या अनुषंगाने बावधन पोलीस पुन्हा तपास करणार आहेत. आज पौड न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयाने 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 23 Dec 2025 04:55 PM (IST)

    रविंद्र धंगेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार यांची मुंबई येथे भेट

    रविंद्र धंगेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी पुणे महानगरपालिकेत 165 जागा लढवाव्यात, अशी रवींद्र धंगेकर यांची इच्छा आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावरती लढवावी यासाठी धंगेकर आग्रही आहेत. रविंद्र धंगेकर या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

  • 23 Dec 2025 04:16 PM (IST)

    मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीची तयारी पूर्ण, रिजनल अधिकाऱ्यांची नियुक्ती

    मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 रिजनल ऑफिसर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त राधाबीनोद शर्मा यांनी अधिकाऱ्यांसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकीसाठी शहरात 8 लाख 19 हजार 153 मतदार आहेत. एकूण 958 मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. त्याच बरोबर cctv सुद्धा बसवले जाणार आहेत.

  • 23 Dec 2025 04:13 PM (IST)

    शिंदे शिवसेना मुंबई मनपा निवडणुकीत 112 जागा लढण्यावर ठाम

    शिंदे शिवसेना आगामी मुंबई मनपा निवडणुकीत 112 जागा लढण्यावर ठाम आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीत 112 जागा मिळाव्यात यासाठी शिंदे शिवसेना आग्रही आहे. मुंबईतील मराठी बहुल भागामध्ये जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी शिंदे शिवसेना इच्छुक आहे.शिवसेना आणि भाजपा नेत्यांची आज मंगळवारी जागा वाटपाबाबत पुन्हा चर्चा होणार आहे.

  • 23 Dec 2025 04:06 PM (IST)

    एकनाथ शिंदेंची शिवसेना आक्रमक, कारण काय?

    आगामी महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. असं असतानाच मतदार यादीच्या घोळावरुन एकनाथ शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. शिंदे शिवसेना कार्यकर्त्यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. तसेच 2 दिवसांत मतदार यादीत दुरुस्ती करण्याचा अल्टिमेटम दिला.

    एक लाखांहून अधिक हरकतींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे. चुकीच्या प्रभागात मतदारांची नावं आहेत. मतदानाचा हक्क हिरावल्याचा आरोप केला गेला आहे. त्यामुळे 2 दिवसांत सुधारित यादी नाही तर “शिवसेना आपल्या स्टाईलने काम करेल, अशा इशारा शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केडीएमसीला दिला आहे.

  • 23 Dec 2025 03:59 PM (IST)

    हिंदू संघटनांचे मुंबईत आंदोलन

    बांगलादेश येथे सुरू असलेला हिंदूंवरील अत्याचाराचा विरोधात हिंदू संघटनांचे मुंबईत आंदोलन सुरु आहे. बांगलादेशात एका हिंदूची जमावाकडून हत्या करण्यात आली त्याचा निषेध हिंदू संघटनांनी केला आहे.

  • 23 Dec 2025 03:45 PM (IST)

    ठाकरे सेना आणि मनसेत जागा वाटप पूर्ण, उद्या युतीची घोषणा – संजय राऊत

    ठाकरे सेना आणि मनसेत आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकीचे जागा वाटप झाले असून उद्या दुपारी १२ वाजता युतीची घोषणा होणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

     

  • 23 Dec 2025 02:55 PM (IST)

    शेतकऱ्यांना इंग्रजीत आलेला मेसेज कळतो का? अर्जुन खोतकरांचा सवाल

    शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी सीसीआय केंद्रावरील कर्मचाऱ्याची आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून चांगलीच कान उघडणी केली. शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रावर कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. मात्,र ऐनवेळी स्लॉट बुकिंग झालेली नोंदणी रद्द झाल्याने या शेतकऱ्यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे गाऱ्हाणं मांडलं. त्यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी फोनवरून त्या कर्मचाऱ्याला चांगलंच झापलं आणि कापूस खरेदी करून घेण्याच्या सूचना केल्या. शेतकऱ्यांना इंग्रजीत आलेला मेसेज कळतो का ? डोकं ठिकाणावर ठेवून काम करा ना लोकांना त्रास देऊ नका अश्या शब्दात अर्जुन खोतकर यांनी खडेबोल सुनावले.

  • 23 Dec 2025 02:40 PM (IST)

    अजित पवार २६ तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार

    अजित पवार २६ तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत. कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवारांनी २६ तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असे अजित पवार म्हणाले.

  • 23 Dec 2025 02:25 PM (IST)

    शिरूर–भीमाशंकर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनावरून शेतकऱ्यांचा ठिय्या

    भीमाशंकर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० साठी होत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांनी आज राजगुरुनगरमध्ये प्रांत अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन छेडले. भूसंपादनाच्या शिक्क्यांबाबत कोणतीही माहिती न देता सातबाऱ्यावर नोंदी झाल्याने शेतकऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

  • 23 Dec 2025 02:15 PM (IST)

    तमाशाच्या कार्यक्रमात तरुणाला बेदम मारहाण

    बीडच्या केज तालुक्यातील सोनी जवळ येथे म्हसोबा यात्रेच्या निमित्त तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री 11 वाजता हा कार्यक्रम सुरू असताना सुधीर प्रकाश वैरागे नामक तरूणाला एका टोळक्याकडुन लाकडी काठ्या आणि लाथा बुक्क्याने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये तरूण गंभीररित्या जखमी झाला असुन अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

  • 23 Dec 2025 01:55 PM (IST)

    नाशिक महापालिकेत जागावाटपाचा तिढा; महायुतीत वादाची ठिणगी

    नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील जागावाटपाचा पेच अधिकच वाढला आहे. एकूण १२२ जागांपैकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ४५, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ३० जागांवर दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे, भाजपकडे मागील निवडणुकीतील ६६ आणि नव्याने प्रवेश केलेले १३ असे एकूण ८९ नगरसेवक सोबतीला आहेत. त्यातच १२२ जागांसाठी भाजपकडे तब्बल १२०० इच्छुकांनी अर्ज केल्याने तिकीट वाटपावरून पक्षात मोठा पेच निर्माण झाला आहे. वरिष्ठ पातळीवरून महायुतीचे आदेश असले, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा कल स्वबळावर लढण्याकडे असल्याने नाशिकच्या राजकारणात सध्या अनिश्चिततेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

  • 23 Dec 2025 01:45 PM (IST)

    शिवसेनेत राहुल शेवाळेंचे वजन वाढले, एकनाथ शिंदेंनी केले प्रमोशन

    शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची पक्षाच्या जनरल सेक्रेटरी (सरचिटणीस) पदी नियुक्ती केली आहे. सध्या भाजपसोबतच्या महत्त्वाच्या वाटाघाटींमध्ये राहुल शेवाळे सक्रीय भूमिका बजावत आहेत. त्यांना पक्षात हे मानाचे स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे गटात आदित्य ठाकरे ज्या पदावर कार्यरत आहेत, त्याच तोडीचे पद देऊन शिंदेंनी शेवाळेंची ताकद वाढवली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे यांची ही बढती पक्ष संघटनेत त्यांचे महत्त्व अधोरेखित करणारी मानली जात आहे.

  • 23 Dec 2025 01:35 PM (IST)

    काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर, सुनील केदार यांच्यावर मोठा आरोप

    नागपूर जिल्हा नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यातील २७ पैकी केवळ १ नगराध्यक्ष निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष असून, या पराभवाचे खापर माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर फोडण्यात येत आहे. केदार यांनी तिकीट वाटपात मनमानी केली आणि निष्ठावंतांना डावलून केवळ आपल्या मर्जीतील लोकांनाच उमेदवारी दिल्याने काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचा गंभीर आरोप असंतुष्ट गटाने केला आहे. विशेष म्हणजे, सुनील केदार यांचा बालेकिल्ला असलेल्या सावनेरमध्येही काँग्रेसला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

  • 23 Dec 2025 01:25 PM (IST)

    ठाणे महानगरपालिका नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडे इच्छुकांची झुंबड, आज मुलाखतींचा थरार

    ठाणे: ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाण्यातील ३३ प्रभागांमधील १३१ जागांसाठी शिवसेनेच्या वतीने आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या जागांसाठी तब्बल ११६५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज दुपारी टेंभी नाका येथील आनंदआश्रम येथे या मुलाखती पार पडणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, शिवसेनेतील या प्रचंड उत्साहाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शिवसेना-भाजप युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

  • 23 Dec 2025 01:15 PM (IST)

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? अजित पवार आणि शरद पवार गटात युतीची दाट शक्यता

    पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. गेल्या काही काळापासून दुरावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आता आगामी निवडणुकांसाठी एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे नेते सुभाष जगताप, चेतन तुपे आणि सुनील टिंगरे यांनी शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा केली असून, ही चर्चा सकारात्मक झाली आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकत्र लढण्याबाबत होकार दर्शवला असून, या संदर्भातील अंतिम माहिती देण्यासाठी हे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. दोन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांनी युतीसाठी हिरवा कंदील दाखवला असून, येत्या दोन दिवसांत या ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • 23 Dec 2025 01:05 PM (IST)

    कोरेगाव भिमा-वढु परिसरात बिबट्या जेरबंद, शौर्य दिनापूर्वी वनविभागाची मोठी कारवाई

    येत्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भिमा आणि वढु परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली होती. लाखो अनुयायी या ठिकाणी अभिवादनासाठी येणार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, आज वनविभागाने वढु परिसरात यशस्वी मोहीम राबवून एका बिबट्याला जेरबंद केल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. या परिसरात अजूनही इतर बिबट्यांचे वास्तव्य असण्याची शक्यता असल्याने, शौर्य दिनाच्या कार्यक्रमापूर्वी संपूर्ण परिसराचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे राहिले आहे.

  • 23 Dec 2025 12:58 PM (IST)

    शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपासंबंधी महत्त्वाची बैठक

    २०१७ साली जिंकलेल्या जागा शिवसेनेलाच मिळाव्यात.आम्ही जिंकलेल्या जागा आम्हीच लढवणार तुम्ही जिंकलेल्या जागा तुम्ही लढवा.बाकी ज्या जागांवर शिवसेना आणि भाजप नंबर एक आणि नंबर जोवर आहेत त्या जागांबाबत आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे ठरवतील. कालच्या वर्षावरील बैठकीत शिवसेना नेत्यांकडून भाजप नेत्यांकडे मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • 23 Dec 2025 12:50 PM (IST)

    मालेगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज विक्री प्रक्रिया आजपासून सुरू

    मालेगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज विक्री प्रक्रिया आजपासून सुरू झाली. शहरातील २१ प्रभागांतून एकूण ८४ नगरसेवक निवडून येणार आहे.आजपासून अर्ज विक्री तसेच अर्ज स्वीकारण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली आहे.निवडणूक प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. उमेदवारांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.२१ प्रभागांसाठी एकूण ७ ठिकाणी अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आले आहे.सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांची व समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली. ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज स्वीकारले जाणार आहेत.आगामी काही दिवसांत निवडणूक वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

  • 23 Dec 2025 12:40 PM (IST)

    मित्र पक्षांनी जागांसंदर्भात सामंजस्य दाखवलं तर निश्चितच नागपुरात महायुती

    नागपुरात महायुती व्हावी,असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आहे त्या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते प्रयत्नही करत आहेत.मित्र पक्षांनी जागांसंदर्भात सामंजस्य दाखवलं तर निश्चितच नागपुरात महायुती होईल, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी प्रवीण दटके यांनी दिली आहे.सध्या नागपुरात मित्र पक्षांसोबत महायुतीसाठीची चर्चा सुरू आहे.आमचे सर्व वरिष्ठ नेते महायुती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.फक्त मित्र पक्षांचा जास्त जागांच्या आग्रह संदर्भात काय निर्णय होतो यावर महायुतीचा भवितव्य ठरेल असे दटके म्हणाले.

  • 23 Dec 2025 12:30 PM (IST)

    सुधीर मुनगंटीवार प्रकरणात एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य

    सुधीर मुनगंटीवार यांचा एकनाथ खडसे भाजपात केला जातोय का ? यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार हे विरोधकांशी सामना करू शकतात मात्र पक्ष अंतर्गत विरोधकांचा सामना करणं त्यांना अवघड आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. चंद्रपूर मध्ये त्यांना जे अपयश आलं याचं कारण म्हणजे पक्ष अंतर्गत विरोधकामुळे हे अपयश आल्याचा दिसतो. पक्षविरोधी पवृत्त्या कोणत्या त्यांच्या मागे ज्या उभे आहेत ते वारंवार ते बोलले आहेत. माझ्या कालखंडात मी केलेला संघर्ष तसा संघर्ष त्यांचा पक्षात सुरू झाल्याचे दिसते. सुधीर मुनगंटीवार यांचं भाजप पक्ष वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे.त्यांच्याबाबत काही विषय घडतात आणि काही अनावधानांनी घडून आणला जातात, त्यामुळे घडून आणलेल्या परिस्थितीत ते अडकून पडले आहेत, अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली.

  • 23 Dec 2025 12:20 PM (IST)

    जालन्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष अजूनही संभ्रमात

    आगामी होऊ घातलेल्या जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात झाली,एकीकडे आघाडी किंवा युती होणार की नाही हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे मात्र दुसरीकडे भाजप शिवसेना आणि काँग्रेस पक्ष सर्वच जागेवर उमेदवार देण्यासंदर्भात मुलाखतीच्या माध्यमातून चाचपणी करताना पाहायला मिळत आहे.शिवसेनेने दिलेल्या युती करण्यासंदर्भात प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाकडून अद्याप कोणताही उत्तर मिळालं नाही तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपाचा पेज कायम आहे त्यामुळे युती किंवा आघाडी होणार की नाही याबाबत महायुती आणि महाविकास आघाडी मधील मित्रपक्ष संभ्रमात आहेत. भाजप नेत्यांकडून महानगरपालिकेत स्वबळाचा सूर निघत असल्याचं पाहायला मिळत आहे तर शिवसेनेने सुद्धा महापौर पदाचा उमेदवार घोषित करून टाकलाय,काँग्रेस पक्षाने देखील जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली, दरम्यान आज पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होत आहे मात्र महायुती आणि महाविकास आघाडी होईल की नाही हे मात्र गुलदस्त्यातच आहे त्यामुळे सर्वच पक्ष स्वबळावर लढणार की काय असंच काही सचित्र जालन्यात निर्माण झालंय.

  • 23 Dec 2025 12:11 PM (IST)

    संतोष देशमुख खूनप्रकरणात आरोपींवर दोष निश्चिती

    सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींवर अखेर दोष निश्चित झाल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली. आरोपींवरील ड्राफ्ट कोर्टाने वाचून दाखवला.वाल्मीक कराड सह सर्वांनी आरोप मान्य नसल्याचे म्हटले.

  • 23 Dec 2025 12:00 PM (IST)

    त्या अपहरण प्रकरणाशी माझा संबंध नाही

    जीवन घोगरे पाटील यांच्या अपहरण प्रकरणाशी माझा काही संबंध नाही,अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे. चौकशीत सत्य बाहेर येईल आरोपानंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून खुलासा करण्यात आला. दादाच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी जीवन घोगरे यांचे काल अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली होती.

  • 23 Dec 2025 11:44 AM (IST)

    मुंबई महानगर पालिकेसाठी निलेश राणेंवर मोठी जबाबदारी

    मुंबई महानगर पालिकेसाठी निलेश राणेंवर मोठी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंवर मोठी जबाबदारी असून वरळी, लालबाग, माहीम, शिवडी, दादर, या भागात निलेश राणेंची तोफ धडाडणार आहे.  लवकरच शिवसेनेचे स्टार प्रचारक जाहीर होणार असून  त्यात निलेश राणे स्टार प्रचारक असतील समजते.

  • 23 Dec 2025 11:15 AM (IST)

    बीड – सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात

    बीड –  सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात झाली असून न्यायालय परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींवर आज दोष निश्चिती होण्याची  शक्यता आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, ॲड. बाळासाहेब कोल्हे उपस्थित असून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही उपस्थित आहे.  VC द्वारे सर्व आरोपी हजर आहेत.

  • 23 Dec 2025 11:10 AM (IST)

    दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची “गुप्त बैठक” सुरू

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाला पुण्यात जोरदार हालचाली चालू झाल्या असून दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची “गुप्त बैठक” सुरू आहेत.  शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून अंकुश काकडे, विशाल तांबे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे उपस्थित आहेत.

    दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांची बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना माहिती पाठवली जाणार आहे.  पुणे महापालिका निवडणुकीच्या जागांवर चर्चा तसेच इतर मुद्दे बैठकीत मांडले जातील.

  • 23 Dec 2025 10:55 AM (IST)

    वसई विरार महापालिका निवडणुकीत महायुती जागा वाटपाचा तिडा कायम

    आज सलग दुसऱ्या दिवशी ही भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयात प्रमुखांची बैठक होणार आहे. काल पासून बैठकांचे सत्र सुरू मात्र काही जागांवर तोडगा निघत नाही. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर, आमदार विलास तरे यांच्यात आज सकाळी ११ वाजता आज दुसऱ्या दिवशी पुन्हा होणार बैठक आहे.

  • 23 Dec 2025 10:45 AM (IST)

    प्रशांत जगताप राजीनाम्याच्या तयारीत

    प्रशांत जगताप राजीनाम्याच्या तयारीत आहेत. प्रशांत जगताप यांचा पक्षासमोर प्रस्ताव ठेवला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणार असतील तर पक्ष सोडणार… अशी जगताप यांची भूमिका आहे. प्रशांत जगताप राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. प्रशांत जगताप दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दोन दिवसांत प्रशांत जगताप निर्णय जाहीर करणार आहे.

  • 23 Dec 2025 10:30 AM (IST)

    राज्यभरातील निवडून आलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष नगरसेवक मुंबईत दाखल

    आज संध्याकाळी ५ वाजता त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार होणार. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दुपारनंतर सर्व नगराध्यक्ष एकनाथ शिंदेंसोबत वंदन करणार. यानंतर दादरच्या वीर सावरकर स्मारक सभागृहात त्यांचा सत्कार होणार आहे.

  • 23 Dec 2025 10:14 AM (IST)

    ठाकरे बंधूंची युती आहेच, फक्त घोषणा बाकी आहे – संजय राऊत

    ठाकरे बंधूंची युती आहेच, फक्त घोषणा बाकी आहे… जागावाटपात आमच्यात कुठेही रस्सीखेच नाही… काल रात्री जागावाटप पूर्ण झालंय… दोन्ही पक्षनेते जागांचा फॉर्म्युला सांगतील… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 23 Dec 2025 09:50 AM (IST)

    दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचालींना वेग

    दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची काल रात्री उशिरा बैठक. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मार्गावर. काल रात्री उशिरा अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधील नेते यांनी केली चर्चा. महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी मधील नेते सकारात्मक

  • 23 Dec 2025 09:40 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिद्धी वस्त्रे हिचा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्कार

    मोहोळच्या 22 वर्षीय तरुण नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सिद्धी वस्त्रे हिचा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्कार. मोहोळ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारत नगराध्यक्षपदी विजय मिळवला

     

  • 23 Dec 2025 09:20 AM (IST)

    भोकरदन तहसील कार्यालयासमोर शेतकरीपुत्र बसले आमरण उपोषणाला

    भोकरदन तालुक्यात रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांनी गाय गोठे वृक्ष लागवड आणि सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला आहे मात्र ही कामे सुरू असून सुद्धा पंचायत समिती प्रशासनाकडून मस्टर काढण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत शेतकरी पुत्रांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान मागील आठवड्यात याच शेतकरी पुत्रांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कडाक्याच्या थंडीत उपोषण केलं.

  • 23 Dec 2025 09:12 AM (IST)

    शेतकऱ्याची किडनी काढण्यावरून मोठी खळबळ

    किडनी विक्री प्रकरणात पीडित शेतकरी रोशन कुडे याने फेसबुकच्या माध्यमातून किडनी विकण्यासाठी माहिती मिळवल्याची आणि त्यानंतर चेन्नई येथील डॉक्टर कृष्णा याने त्याला कंबोडिया येथे पाठवून किडनी काढल्याची दिली होती तक्रार.

  • 23 Dec 2025 09:10 AM (IST)

    अजित पवारांच्या प्रस्तावासाठी काँग्रेस वेटिंगवर

    अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अद्याप आघाडी संदर्भात कुठलाही कुठला प्रस्ताव नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महाविकास आघाडी किंवा काँग्रेसला प्रस्ताव न आल्यास महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार.

  • 23 Dec 2025 09:02 AM (IST)

    बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार

    11 वीच्या विद्यार्थ्याला स्टम्पने चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये घुसून जबरी मारहाण केलीय. प्रसिक बनसोडे असे पिडीत विद्यार्थ्याचे नाव असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. तब्बल तीन तास मारहाण केल्याचा पिडीत विद्यार्थ्याचा आरोप. रूम स्वच्छ करणे, झाडू मारायला लावल्यावर कामे करण्यास नकार दिल्याने केली मारहाण. दारूच्या नशेत मारहाण केल्याचा पिडीत विद्यार्थ्यांचा आरोप. दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत महाविद्यालयाकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नाही.

  • 23 Dec 2025 08:59 AM (IST)

    पुणे- दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचालींना वेग

    पुणे- दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या पुणे शहरातील नेत्यांची काल रात्री उशिरा बैठक झाली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत. काल रात्री उशिरा अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधील नेते यांनी चर्चा केली.

  • 23 Dec 2025 08:45 AM (IST)

    काँग्रेसचा प्लॅन बी तयार, अजित पवारांच्या प्रस्तावासाठी काँग्रेस वेटिंगवर

    अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अद्याप आघाडी संदर्भात कुठलाही कुठला प्रस्ताव नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महाविकास आघाडी किंवा काँग्रेसला प्रस्ताव न आल्यास महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याची काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आहे.

  • 23 Dec 2025 08:44 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीचा पेच कायम

    आज पासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार असली तरी अजूनही छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीचा पेच कायम आहे. काल शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या घरी युतीसाठी चौथी बैठक झाली पण, ही बैठक ही निष्फळ ठरली.

  • 23 Dec 2025 08:41 AM (IST)

    नाशिक- शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शहरात आणखी एक धक्का

    नाशिक- शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शहरात आणखी एक धक्का बसला आहे. युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार यांनी भाजपात प्रवेश केला. बबलू शेलार हे शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे आहेत.गजानन शेलार मात्र या प्रवेशा बाबत बोलण्यास तयार नसल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.