Sanjay Gaikwad : हर्षवर्धन सपकाळांनी चांगल्या महिलांना एड्स… आमदार संजय गायकवाडांच्या आरोपांनी एकच खळबळ
Sanjay Gaikwad allegaion on Harshvardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डिफेंडर कारचा आरोप केल्यानंतर बुलडाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांची जोरदार चर्चा सुरू आहे.

Buldhana News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सत्ताधारी 21 आमदारांना डिफेंडर कार एका ठेकेदाराने दिवाळी भेट म्हणून दिल्याचा आरोप केला. त्यातील एक कार बुलडाण्यात फिरत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर आज शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सपकाळ यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी सपकाळ हे बुलडाणा मतदार संघाचे आमदार होते.
प्रसिद्धीसाठी सपकाळांचा आरोप
सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर वाटल्या असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल बुलडाण्यात केला होता. त्यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. ते 21 आमदार कोण आणि तो ठेकेदार कोण असा सवाल करण्यात येत आहे. त्यांची माहिती लवकरच देणार असल्याचे सपकाळ यांनी काल स्पष्ट केले.
त्यावर आज बुलडाण्यातील शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आमदारांवर कुणी काय आरोप करत असेल तर त्यांनी पाहिले सिद्ध केले पाहिजे .बिनबुडाचे आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असे आरोप करत असल्याचे गायकवाड म्हणाले. गाडीवरील सिम्बॉल मला विधानसभेने दिलाय. तुमच्या गाडीवर ही असाच सिम्बॉल होता. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमदारांच्या गाडीला सिम्बॉल आहे. मग तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष आहात. मग राज्यातील आमदार-खासदारांना त्यांच्या गाडीवर सिम्बॉल काढायला सांगा. त्यांना असे तमाशा करु नका असे सांगा. सिम्बॉल लावणे म्हणजे तमाशा करणे आहे म्हणून सांगा असा खोचक टोला गायकवाडांनी सपकाळांना लगावला.
एड्सग्रस्तांचे लाटले अनुदान
दरम्यान बुलडाण्यातील डिफेंडर कार ही 21 वी आहे की 22 वी हे शोधावं लागेल असे सूचक वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी काल केले होते. त्यावर गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सपकाळांनी या कारविषयी शोध घ्यावा असे आवाहन त्यांनी दिले. तर सपकाळ हे बुलडाण्याचे आमदार असताना एड्सग्रस्त महिलांच्या यादीत चांगल्या चांगल्या महिला होत्या आणि त्यांचे अनुदान सपकाळ यांनी लाटले, त्याचाही त्यांनी शोध घ्यावा असे खळबळजनक वक्तव्य गायकवाड यांनी केले.
पैसे देण्यासाठी सरकारची कसरत
दिवाळीनंतर घोटाळा बाहेर काढणार, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैशाची तडजोड करावी लागत आहे. लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता कसरत करावी लागत आहे .वर्षभरात एक काम झाले नाही आणि मग सपकाळ कुठून घोटाळा शोधणार असा सवाल त्यांनी केला. घोटाळा वगैरे काही नाही. नवीन आमदारांना पाच कोटी विकास कामासाठी दिले आहे. ते काही घोटाळा करण्यासाठी दिले नाही असा टोला त्यांनी लगावला.
