थोरातांना मंदी कळते का? ती एका देशातून दुसरीकडे जात नाही : चंद्रकांत पाटील

एका कुटुंबाला वाटले म्हणून मंत्री, मुख्यमंत्री आणि नाईट लाईफ असे सुरु आहे. नाईट लाईफ कायदा सुव्यवस्था बिघडवणार आणि पोलीस यंत्रणांवर ताण वाढवणार आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

Chandrakant Patil on Balasaheb Thorat, थोरातांना मंदी कळते का? ती एका देशातून दुसरीकडे जात नाही : चंद्रकांत पाटील

उस्मानाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मंदी कळते का? असा प्रश्न करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली. मंदी एका देशातून दुसऱ्या देशात जात नसते, जगभर मंदी असते, त्यामुळे थोरातांनी मंदी काय असते, हे समजून घ्यावे असा खोचक सल्ला पाटील यांनी (Chandrakant Patil on Balasaheb Thorat) दिला.

सध्याचे सरकार आधीच्या सरकारच्या सर्व योजना रद्द करत आहे. त्यामुळे या सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागू देत, अशी प्रार्थना चंद्रकांत पाटील यांनी तुळजाभवानी चरणी केली. ‘कर्जमाफी फसवी ठरत असून नवीन घोषणा केली जात नाही. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला स्थगिती दिली असून स्थगिती देणारे सरकार अशी यांची ख्याती होत चालल्याचा घणाघातही चंद्रकांत पाटलांनी केला.

हे सरकार पडण्यासाठी नकारार्थी प्रार्थना मी कधीच करत नाही. जोपर्यंत सरकार आहे, तोपर्यंत त्यांच्यात समन्वय राहू दे. 100 युनिट वीज माफी, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25 हजार अशा अनेक मुद्द्यांवर तिजोरीत पैसा नसल्याचे कारण सांगत समन्वय दिसत नाही. त्यामुळे हे सरकार लोकोपयोगी पडू दे, अशी प्रार्थना केल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

100 युनिट वीज मोफत या मुद्द्यावर सरकारमधील मंत्री एकमेकांची खिल्ली उडवत आहेत. महिला असुरक्षित असताना नाईट लाईफ सुरु केली आहे. समाजरचना नियमाने नीट राहते, एका कुटुंबाला वाटले म्हणून मंत्री, मुख्यमंत्री आणि नाईट लाईफ असे सुरू आहे. त्यामुळे नाईट लाईफ कायदा सुव्यवस्था बिघडवणार आणि पोलीस यंत्रणांवर ताण वाढवणार आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

A9 नावाचा बंगला मी वापरला, त्याला 5 वर्षात रंगही लावला नाही आणि खर्चही केला नाही. मात्र सध्याचे सरकार बंगले दुरुस्ती करताना भिंती पाडत आहेत. होत्याचे नव्हते केले. तुम्ही किती दिवस राहणार आहात? बंगले पूर्ण होण्याच्या आधीच तुम्ही जाणार आहेत. त्यासाठी किती खर्च करता?  टेंडर न करता पैशाची उधळपट्टी सुरु आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त ताटात ओढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला.

दिल्लीत भाजपला 39 टक्के मते मिळाली. शिवसेनेला 0.1 टक्का, तर राष्ट्रवादीला 0.2 टक्के मतं मिळाली. ज्या काँग्रेसने 50 वर्ष दिल्लीवर राज्य केले त्यांना 4 टक्के मते मिळाली. भाजपला गेल्या वेळी 33 टक्के मतं मिळाली होती. तीन जागांवरुन 8 झाल्या. खूप जागा कमी मतांनी पडल्या, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पराभव आम्हाला मान्य असल्याचं सांगितलं.

शिवसेनेने त्यांच्या पायाखाली काय जळते हे पाहावे, शिवसेनेत स्वतःचे कर्तृत्व काही नाही. हिंमत असेल तर निवडणुका लावा, भाजप काय असते ते दाखवू. एकमेकांचे जुळत नसताना सगळे एकत्र आले यातच आमचा विजय असल्याचंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil on Balasaheb Thorat) म्हणाले.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *