माणिकराव कोकाटेंच्या रमी प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, आता अजितदादा काय निर्णय घेणार?
माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला, या व्हिडीओनंतर राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून सरकराची कोंडी सुरू असून, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे, अशाप्रकारे विधानभवनात जेव्हा चर्चा सुरू असते तेव्हा आपलं काम नसलं तरी सिरिअसली बसणं गरजेचं आहे. साधारणपणे एखाद्यावेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकीच्या गोष्टी वाचता. पण रमी खेळतानाचा व्हिडीओ हा निश्चितच योग्य नाही, अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिला आहे. मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती जाहिरात आली. पण जरी त्यांनी सांगितलं असलं तरी एकूण जे काही घडलं आहे, ते काही आम्हाला भूषणावह नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनर पोस्टर न लावण्याचं आवाहन देखील कार्यकर्त्यांना केलं आहे. बॅनर पोस्टर लावू नका, हे मी आधीच बोललो होतो. बॅनर पोस्टर लावत मला खूश करता येणार नाही, त्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा, असं आवाहन मी केलं आहे, आणि त्याला प्रतिसाद देखील मिळत आहे, अशी माहितीही यावेळी फडणवीस यांनी दिली आहे.
उद्या माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषद
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा एका व्हिडीओ समोर आला आहे , त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. उद्या माणिकराव कोकाटे पत्रकार परिषद घेणार आहेत, राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार? याकडे आता सर्वाचंं लक्ष लागलं आहे.
दरम्यान दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्या संदर्भात पक्ष अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं आहे.
