पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर

दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आता पुणे आणि मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona patient in Thane).

पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर

मुंबई : दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आता पुणे आणि मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona patient in Thane). नुकताच फ्रान्समधून आलेल्या ठाण्याचा 35 वर्षीय तरुणालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याला कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आज (12 मार्च) 3 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यात हिंदूजा रुग्णालयात भरती असलेला आणि दुबईहून आलेल्या 64 वर्षाचा पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

याआधी अमेरिकेहून आलेल्या पुण्याच्या 33 वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. अशाप्रकारे आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 वर पोहचली आहे. सर्व कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीयांचाही शोध युध्दपातळीवर सुरु आहे. आज राज्यात एकूण 50 नवीन संशयित भरती झाले आहेत, असी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

1295 विमानांमधील 1 लाख 48 हजार 706 प्रवाशांची तपासणी

12 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1295 विमानांमधील 1 लाख 48 हजार 706 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार राज्यातील या 3 प्रमुख विमानतळांवर सर्व देशांहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे.

राज्यात बाधित भागातून एकूण 685 प्रवासी

ब्युरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि द कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने 21 फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण 685 प्रवासी आले आहेत.

आतापर्यंत 399 संशयितांपैकी 14 जणांना कोरोनाची लागण

18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 399 जणांना भरती करण्यात आलं आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व 317 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 14 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 51 जण पुणे येथे, तर 27 जण मुंबईत भरती झाले आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वाय. सी. एम. रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत.

विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 बेड्सची व्यवस्था

राज्यात नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून सर्व जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 बेड्स उपलब्ध आहेत. 12 मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित असणाऱ्या देशातून आलेल्या इतर प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यासाठी या प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 685 प्रवाशांपैकी 383 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Corona patient in Thane

Published On - 11:12 pm, Thu, 12 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI