आमदार प्रणिती शिंदेंविरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केल्याचा शिंदे यांच्यावर दोषारोप आहे.

आमदार प्रणिती शिंदेंविरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

सोलापूर : शिखर बँकेच्या प्रकरणावरून राज्यातील अनेक नेते अडचणीत आलेले असताना, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांच्या अडचणी सुद्धा वाढल्या आहेत. जिल्हा न्यायालयात तारखेला हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलाय. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केल्याचा शिंदे यांच्यावर दोषारोप आहे.

सोलापुरात 2 जानेवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमधील महागलेल्या वैद्यकीय उपचारासंदर्भात दरवाढ रद्द करा, अशी घोषणाबाजी करत पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात आला.

यावेळी बंदोबस्तास उपस्थित असलेल्या पोलिसांबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत हुज्जत घातली. या धक्काबुक्कीत पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला.

सदर बाजार पोलिसांनी आमदार प्रणिती शिंदे आणि गुन्हे दाखल झालेल्या इतर जणांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोप सादर केलं. यासंदर्भात सोलापूर जिल्हा न्यायालयात तारीख होती. न्यायालयाने दिलेल्या तारखेला आमदार प्रणिती शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे हे हजर राहिले नाही. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने आमदार प्रणिती शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढलंय, तर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय.

आमदार प्रणिती शिंदे यांच्याबरोबर माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या सह अन्य सहा जणांनी न्यायालयातल्या तारखेला हजेरी लावली. त्यांना न्यायालयाने 29 ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन दिलाय. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे या लवकरच जिल्हा न्यायालयात हजर होणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *