Beed: फटाक्यांचा पाऊस, जंगी स्वागत, बीडचा गुंड तुरुंगाबाहेर येताच तुफान जल्लोष!
गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. अशातच आता एका गुंडाचे तुरूंगातून सुटल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत केल्याचा प्रकार समोर आला आहे.

गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. अशातच आता एका गुंडाचे तुरूंगातून सुटल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत केल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड शहरातील सराईत गुन्हेगार शेख नवीद शेख चाँद या गुंडावर बीड पोलिसांनी MPDA अंतर्गत 3 जुन 2025 रोजी कारवाई केली होती. त्याच्यावर पेठ बीड पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र आता तो जामीनावर बाहेर आला आहे.
गुंडाचे जंगी स्वागत
बीड पोलिसांनी शेख नवीद शेख चाँदला अटक केली होती. या कारवाईनंतर त्याने हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. त्याला दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला. यानंतर तो बाहेर आल्यानंतर काल सायंकाळी 5 वाजता बीड शहरातील मोमीनपुरा भागात फटाक्यांची आतिषबाजी करत त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी लहान-लहान मुलांच्या हातांमध्ये स्प्रे देऊन ते उडवायला लावले तर काहींना रंग उधळायला लावला. अशा पद्धतीने एका गुंडाचं भर रस्त्यावर मोठ्या थाटात स्वागत केलं जात होतं.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचेही उल्लंघन
शेख नवीद शेख चाँदच्या स्वागतामुळे रस्त्यावर वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. याच वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका अडकली होती. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी रुग्णवाहिकेला बराच वेळ लागला. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलेले आहेत त्याचंही या गुंडाने उल्लंघन केलं. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
गुंडासह त्याचे स्वागत करणाऱ्यांवर कारवाई करणार, पोलीसांची माहिती
समोर आलेल्या माहितीनुसार शेख नवीदने एका महिलेला मारहाण केली होती. याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता फिर्यादी महिलेने आपल्या घरासमोरून त्याने रॅली काढली असे म्हणत अशा व्यक्तीवर आता कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता आम्ही सदरील गुंडावर आणि लोकांवर कारवाई करणार असल्याची माहिती पेठ बीड पोलीस स्टेशनचे अधिकाी अशोक मुदीराज यांनी दिली आहे.
