एकनाथ शिंदेंचा भर सभेतून उदय सामंतांना फोन, स्पीकरवर ठेवला अन्…; नेमकं काय घडलं?
महाबळेश्वर येथील जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना थेट फोन लावून १० हजार रोजगाराच्या आश्वासनाबाबत जाब विचारला.

राज्यात सध्या निवडणुकीचा धुरळा सुरु आहे. महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाबळेश्वर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुती आणि विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. महाबळेश्वर येथील प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क भरसभेतून उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावला. यावेळी त्यांनी उदय सामंताना १० हजार रोजगाराच्या आश्वासनाबाबत जाब विचारला. या आगळ्यावेगळ्या संवादामुळे सभेत उपस्थित मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
महाबळेश्वरमधील सभेला संबोधित करत असताना एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना कॉल केला. त्यांनी लाऊडस्पीकरवरून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदेंनी मी इथे महाबळेश्वरला प्रचारासाठी आलोय. तुम्ही जेव्हा दावोसला (World Economic Forum) गेला होतात, तेव्हा महाबळेश्वरच्या भागासाठी १० हजार लोकांसाठी एक इंडस्ट्री आणणार होतात, त्याचं काय झालं? असा प्रश्न केला.
यावर उत्तर देताना उदय सामंत यांनी तातडीने अपडेट दिले. आपल्या आदेशानुसार या ठिकाणी उद्योग आणण्याचं फायनल झालं आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ८ ते १० हजार तरुणींना थेट रोजगार उपलब्ध होऊ शकतो. याची प्राथमिक प्रक्रिया दावोस दौऱ्यातच पूर्ण झाली असून, सध्या आचारसंहिता असल्याने पुढील कार्यवाही थांबली आहे. आचारसंहिता संपताच यावर विशेष बैठक होईल आणि प्रकल्पाच्या जागेचे नियोजन निश्चित केले जाईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी शिवसेनेने मायक्रो प्लॅनिंगवर भर दिला आहे. एकनाथ शिंदे स्वतः राज्यभरात ३० हून अधिक सभा आणि रोड शो करणार आहेत. यावेळी मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी शिवसेनेची प्रचार यंत्रणा सक्रिय झाली आहे. यावेळी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र रणनीती आखण्यात आली आहे. भाषणांमध्ये केवळ राजकीय टीका न करता दावोसमध्ये झालेले सामंजस्य करार, स्थानिकांना मिळणारा रोजगार आणि पायाभूत सुविधांवर शिंदे भर देत आहेत.
महापालिका निवडणुकांचे निकाल ताजे असतानाच जिल्हा परिषदेत आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. सातारा हा उपमुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा असल्याने महाबळेश्वरसारख्या महत्त्वाच्या भागात रोजगाराचा मुद्दा उचलून धरून त्यांनी स्थानिक मतदारांना साद घातली आहे. ८ ते १० हजार महिला आणि तरुणींना रोजगार देणारा हा प्रकल्प सातारा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा ठरू शकतो.
