महापालिका निवडणुकांपूर्वी एकनाथ शिंदेंचे विरोधकांना थेट चॅलेंज, मोठा बॉम्ब फोडणार
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील उत्साहाचे वर्णन करत, धर्मवीर आनंद दिघे यांच्या वारशाचे स्मरण केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध ठिकाणी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. यावेळी ते जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे. आता दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांची दिवाळी गोड, आनंदी, सुखाची, समृद्धीची आणि आरोग्यदायी जावो, अशा शुभेच्छा सर्व नागरिकांना दिल्या. शिवसेना आणि जिजाऊ संस्थेच्या वतीने निलेश सांबरे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली. आता दुपार झाली असली तरी, दिवाळी पहाटच्या निमित्ताने सगळीकडे जो उत्साह आणि जल्लोष दिसून येत आहे, तो आनंददायी आहे. सगळ्यांची दिवाळी गोड, आनंदी, सुखाची, समृद्धीची आणि आरोग्यदायी जावो,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाणे मध्ये फिरत असताना प्रचंड उत्साह, जोश आणि जल्लोष पाहायला मिळाला. तरुणाई ओसंडून वाहत होती. धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात उत्सवाला सुरुवात केली. प्रत्येक सण साजरा झाला पाहिजे. सगळे लोक एकत्र आले पाहिजे, ही भावना ठेऊन कार्यक्रम केले जातात. ठाण्याला सणांचे आगळं-वेगळं महत्त्व आहे.”
ठाण्याला उत्सवाच्या पंढरीचे स्वरूप
ठाणेकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शिंदे म्हणाले, मला आनंद आणि समाधान आहे की ठाणेकरांनी मला मोठा केला. त्यांच्या आशीर्वादामुळे मी मुख्यमंत्री झालो आणि आता उपमुख्यमंत्री आहे. त्यांचे आशीर्वाद माझ्यामागे आहेत. आज बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. हे सण-उत्सव त्यांनी वाढवले आणि ठाण्याला उत्सवाच्या पंढरीचे स्वरूप दिले आहे.”
राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीवर भाष्य करताना त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. शेतकरी संकटात आहे. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू होते. आम्ही बांधावर गेलो आणि शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे सांगितले. नुकसान भरपाईपोटी महायुतीने मदत जाहीर केली आहे. या मदतीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
महायुतीचा आयटम बॉम्ब फुटल्याशिवाय राहणार नाही
यावेळी एकनाथ शिंदेंनी राजकीय विरोधकांवर हल्लाबोल केला. गेल्या वेळी मी इथेच बोललो होतो की विधानसभेत लँडस्लाईड मतदान होईल आणि निवडून येऊ आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील तेच होणार आहे. गेल्या काही दिवसात हे लोक बोलत होते की निवडणूक घ्या, पण आता ते घाबरत आहेत म्हणून निवडणुका पुढे ढकला असं सांगत आहेत. जेव्हा पराभव दिसतो तेव्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार करतात. हा त्यांचा रोजचा धंदा झाला आहे. या लोकांनी कितीही लवंगी बॉम्ब फोडला तरीसुद्धा आता महायुतीचा आयटम बॉम्ब फुटल्याशिवाय राहणार नाही,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
लोकांचा मन वळवत आहेत आणि स्वतःची हार लपवण्यासाठी ते हे सगळं काम करत आहेत. त्यांचा विजय झाला तर सगळं ईव्हीएम योग्य आणि आता अयोग्य झाला. पण काहीही झालं तरी विजय हा महायुतीचाच होणार आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.
