भयंकर…तांदळात सापडला मेलेला साप, तीन दिवस भात बनवला..अखेर..
देशातील ८० कोटी जनतेला रेशनिंगवरुन मोफत धान्य दिले जाते. मात्र आता रेशनिंगच्या धान्यात मृत साप सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

देशात गरीबी असल्याने सरकार ८० कोटी जनतेला रेशनिंगद्वारे मोफत धान्य देते असते. परंतू या धान्याबाबत नेहमीच अनेक तक्रारी पाहायला आणि ऐकायला मिळत असतात. कधी हे धान्य निकृष्टदर्जाचे असते. तर कधी यात धान्य कमी आणि खडे जास्त असतात. त्यामुळे हे धान्य निवडताना गृहीणींच्या नाकीनऊ येते. आता यावरही कडी झाली आहे. एका रेशनधारकाला रेशनिंगच्या तांदुळात चक्क मेलेला साप आढळल्याने खळबळ उडाली आहे.
सोलापूरातील मोदी परिसरात राहणाऱ्या एका रेशनधारकाला त्याने घेतलेल्या तांदळात मेलेला साप सापडल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात नागरिकाने याची रितसर तक्रारही केली आहे. मोदी परिसरातील राम भंडारे या रेशधारक व्यक्तीला रेशनिंग वरुन आणलेल्या तांदळात हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने नागरिकांत घरबराट पसरली आहे.
तीन दिवस तांदूळ खाल्ला
भंडारे कुटुंबाला हा मेलेला साप लागलीच दिसला नाही. त्यांनी रेशनिंग वरुन आणलेला हा तांदुळ तीन दिवस शिजवून खाल्ला असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाला तीन सदस्यांना उलटी आणि जुलाब झाल्याचे भंडारे यांनी म्हटले आहे. या संदर्भात आम्ही तक्रार केली आहे. तसेच आम्ही या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे देखील तक्रार करणार आहोत असे भंडारे यांनी म्हटले आहे.
आम्ही सत्तेतील असलो तरी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी असणार आहे. तीन महिन्यापूर्वी याच परिसरात दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू झाला होता. सरकारने आम्हाला थोडं थोडं विष देऊन मारण्यापेक्षा एकदाच मारून टाकावे अशी उद्वीग्न प्रतिक्रीया राम भंडारे यांनी व्यक्त केली आहे.
फॉरेन्सिक तपासणी
रेशनच्या तांदळात मेलेला साप आढळलेल्यात तक्रार आल्यानंतर आम्ही तांदूळ जप्त करुन पंचनामा करत आहोत. आम्ही हा तांदूळ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवतो आहोत. याबाबतचा अहवाल आल्यावर आम्ही संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे पुरवठा विभागाचे परिमंडळ अधिकारी प्रफुल्ल नाईक यांनी सांगितले.
