महाराष्ट्रात संचारबंदीचा विचार, उपमुख्यमंत्र्यांचा इशारा, विनाकारण रस्त्यावर दिसल्यास गुन्हा

परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला जाऊ शकेल, असे स्पष्ट संकेतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. (Ajit Pawar hints imposing Curfew)

महाराष्ट्रात संचारबंदीचा विचार, उपमुख्यमंत्र्यांचा इशारा, विनाकारण रस्त्यावर दिसल्यास गुन्हा

मुंबई : ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचं आणि घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या आणि रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास राज्यात संचारबंदीही लागू केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. (Ajit Pawar hints imposing Curfew)

घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांमुळे ‘कोरोना’ची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मोजक्या ‘निर्बुद्धां’मुळे राज्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतले, परंतु हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही. बंदी आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणारच, असा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

‘कोरोना’ची साथ पसरु नये, यासाठी शासन आवश्यक ती सर्व पावले उचलेल, परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला जाऊ शकेल, असे स्पष्ट संकेतही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांचं, निर्बंधांचं पालन राज्यातील बहुतांश जनता करत आहे. राज्याचा आरोग्य विभाग, पोलिस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांचे, तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी त्यांची जबाबदारी जीवाचा धोका पत्करुन उत्तमपणे पार पाडत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या सर्वांची मेहनत राज्य शासन वाया जाऊ देणार नाही. त्यासाठी शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. विलगीकरण केलेल्या संशयितांनी निर्बंध मोडून लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करु नये, तसे केल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करुन कारवाई करु, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

(Ajit Pawar hints imposing Curfew)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI