…तर भावांनो टक्क्यातही ठेवणार नाही, हैदराबाद गॅझेटवरून वातावरण तापलं, धनंजय मुंडेंचा थेट जरांगेंना इशारा
राज्यात हैदराबाद गॅझेटवरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. आता धनंजय मुंडे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा देण्यात आला आहे, ओबीसी समाजाकडून या जीआरला विरोध होत आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं राज्यात हैदराबाद गॅझेट लागू केलं, मात्र हैदराबाद गॅझेटवरून आता ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करावा अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे.
माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे देखील आता मैदानात उतरल्याचं पहायला मिळत आहे, हैदराबाद गॅझेटवरून वातावरण तापलेलं असतानाच त्यांनी आत थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला इशारा दिला आहे. तसेच आम्हालाही हैदराबाद गॅझेटनुसार एसटीचं आरक्षण देण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी आता केली आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
जर हैदराबाद गॅझेटमुळे इतर कोणाला आरक्षण मिळत असेल, तर आम्हाला सुद्धा गॅझेनुसार एसटीचा फायदा मिळाला पाहिजे. ताकाला जाणं आणि भांड लपवणं हा माझा धंदा नाही. पण आता वंजारा समाजाचं ते दोन टक्के आरक्षण सुद्धा काढा म्हणून काही जण बोलायला लागले आहेत. जे बोलायला लागलेतना दोन टक्के वंजाऱ्यांचं आरक्षण काढा, अरे भावांनो तुम्हाला टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही, लक्षात ठेवा. असा थेट इशारा आता धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे, त्यामुळे आता राज्यात चांगलंच वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजातील नेत्यांची एक बैठक पार पडली होती, या बैठकीला ओबीसी समाजातील सर्व प्रमुख नेते उपस्थिती होते, या बैठकीमध्ये छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. हैदराबाद गॅझेट रद्द करा अशी मागणी या बैठकीमध्ये विजय वडेट्टीवार यांनी केली होती, तर आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आले आहेत, त्याची श्वेत पत्रिका काढण्यात यावी अशी मागणी या बैठकीत पंकजा मुंडे यांनी केली होती. दरम्यान त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या नव्या मागणीमुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
