धनंजय मुंडेंचा आधी शनी शिंगणापुरात अभिषेक, आता गहिनीनाथगड येथे महापुजा

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे उद्या (5 फेब्रुवारी) पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे जाणार आहेत. (Dhananjay Munde visit Gahininathgad).

धनंजय मुंडेंचा आधी शनी शिंगणापुरात अभिषेक, आता गहिनीनाथगड येथे महापुजा

बीड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे उद्या (5 फेब्रुवारी) पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे जाणार आहेत. संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तिथे महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुंडे उपस्थित राहणार आहेत. गेली अनेक वर्षे ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. यावेळी गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमला मुंडे दरवर्षी उपस्थित राहतात. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. मुंडे यावर्षी राज्याचे मंत्री आहेत. त्याचबरोबर ते काही वैयक्तिक आयुष्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत आहेत (Dhananjay Munde visit Gahininathgad).

याआधी धनंजय मुंडे यांनी 30 जानेवारीला सकाळी शनी शिंगणापुरच्या मंदीरात शनी देवाचा अभिषेक केला होता. शनी शिंगणापुरात शनी देवाला अभिषेक केल्यानंतर धनंजय मुंडेंमागची साडे साती संपलीय की संपावी म्हणून त्यांनी अभिषेक केला, याची जोरदार चर्चा रंगली होती. पण धनंजय मुंडे एका मोठ्या राजकीय-सामाजिक संकटातून बाहेर पडत असल्याचं त्यांच्याच देहबोलीवरुन दिसत होतं. त्यातून पूर्ण मुक्त होण्यासाठीच ते शनी देवाच्या चरणी गेल्याचं दिसलं. पण दोन दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात करुणा शर्मा या महिलेने गंभीर आरोप केले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

दरम्यान, गहिनीनाथगड येथे सकाळी सात वाजता महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या पूजेनंतर मुंडे हे याच परिसरातील श्री क्षेत्र हनुमानगड येथेही दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता बीड शहरातील डीपी रोड येथील डॉ. गणेश राऊत यांच्या विश्ववेद अमृत चिकित्सालय या आयुर्वेदिक दवाखान्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

दुपारी अडीच वाजल्यापासून ते बार्शी रोड येथील राष्ट्रवादी भवन जनता दरबारात कार्यकर्ते आणि नागरिकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर बार्शी रोड येथील भगवानबाबा प्रतिष्ठान येथे भेट आणि काही नियोजित भेटीगाठी आटोपून ते परळीकडे रवाना होणार असल्याचे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे (Dhananjay Munde visit Gahininathgad).

हेही वाचा : धनंजय मुंडेंचा आधी शनी शिंगणापुरात अभिषेक नंतर नगरमध्ये ‘वीरा’चं स्वागत !

Published On - 10:19 pm, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI