Naldurg Fort News : खवड्या डोंगरानंतर राज्यात नवा डेथ पॉइंट, नळदुर्ग किल्ला म्हणजे साक्षात मृत्यू, हादरवणारी माहिती समोर, कुस्तीपटू महिलेआधी…
Ashwini Mohite Case Naldurg Fort : राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पोळ यांनी तीन मुलांसह उपळी बुरुजावरून टोकाचे पाऊल उचलले. या घटनेत अश्विनी पोळ आणि दोन मुलांचा मृत्यू झाला, तर एका मुलीवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर नळदुर्ग किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

श्रीराम क्षीरसागर, टीव्ही 9 मराठी, धाराशीव : काहीच दिवसांपूर्वी खवड्या डोंगर घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता. ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती. या ठिकाणी आई वडिल आणि मुलगा या तिघांचाही डोंगरावरुन कोसळून मृत्यू झाला होता. या प्रकरणामागे विविध कारणं असल्याचे सांगितले जात होते. आयफोन, कौटुंबिक कलह असे सर्व कारणं माध्यमांमध्ये चर्चिले गेले. पण सत्य एकच होतं की एकाचवेळी थेट तीन जीवांचा दुर्दैवीरित्या अंत झाला होता. त्यानंतर आता अजून एकदा महाराष्ट्राच्या काळजात धस्स करणारी घटना घडली आहे. राष्ट्रीय लेव्हलची कुस्तीपटू अश्विनी पोळ यांनी आपल्या मुलांसह धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्याच्या उपळी बुरुजावरुन मुलांसह उडी मारली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अश्विनी पोळ यांनी तीन मुलांसह टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनेनंतर किल्ल्यातील सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किल्लेदार नागनाथ गवळी यांच्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत नळदुर्ग किल्ल्याच्या विविध ठिकाणी तब्बल १२ ते १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किल्ल्यातील धोकादायक ठिकाणी अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.
किल्ल्याच्या परिसरात उंच बुरुज, तटबंदी आणि खोल दऱ्या असलेली अनेक ठिकाणे आहेत. काही ठिकाणी संरक्षक कठडे आणि प्रतिबंधक उपाययोजना पुरेशा आहेत का, हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.अश्विनी पोळ यांच्या घटनेनंतर किल्ला प्रशासन, पुरातत्त्व विभाग आणि पोलिस प्रशासनाने धोकादायक ठिकाणांची पाहणी करून सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, धाराशवच्या कुस्तीपटू अश्विनी पौळ मोहिते यांनी आपल्या तीन लहान मुलांसह किल्लातल्या उपळी बुरुजावरुन उडी घेतली. त्यामुळे या घटनेमध्ये अश्विनी पौळ आणि त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसरी मुलगी हिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर एका मुलीवर धाराशीवमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
