गुरुद्वारा कुणाचा? धुळ्यात दोन गट आमनेसामने, मध्यरात्री काय घडलं?
धुळे येथील गुरुद्वाराच्या गादीवरून सुरू असलेल्या वादाचा रविवारी रात्री उद्रेक झाला. बेकायदेशीर ताबा आणि जुन्या हत्येच्या आरोपामुळे संतापलेल्या जमावावर गुरुद्वाराच्या आतून दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून बाबा रणवीर सिंहसह ८ जणांना अटक केली आहे.

धुळे शहरातील ऐतिहासिक गुरुद्वाराच्या गादीवर कोण बसणार, या वादामुळे सध्या शहरात भीषण तणाव निर्माण झाला आहे. गेल्या ४८ तासांपासून सुरु असलेल्या या वादाचा रविवारी रात्री उशिरा उद्रेक झाला. गुरुद्वारावर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप असलेल्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांनी फटाके पेटवल्याने मोठ्या प्रमाणात धूर झाला आणि त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली होती. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य संशयित बाबा रणवीर सिंह यांच्यासह आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
शिख बांधवांमध्ये संतापाची लाट
या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी धुळे गुरुद्वाराचे दिवंगत प्रमुख बाबा धिराजसिंग खालसा यांची झालेली हत्या आहे. शिख समाज बांधवांचा असा आरोप आहे की, या हत्येमागे बाबा रणवीर सिंह यांचा हात आहे. हत्येनंतर रणवीर सिंह यांनी गुरुद्वारावर बेकायदेशीररीत्या ताबा मिळवला. त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून गुरुद्वाराला कुलूप ठोकले होते. गुरुगोविंद सिंग यांची जयंती जवळ आली असताना गुरुद्वाराचे दरवाजे बंद आहे. त्यामुळे सामान्य शिख बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याच पार्श्वभूमीवर रविवारी दुपारपासून शेकडो महिला आणि पुरुष शिख बांधवांनी धुळे शहर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला होता. जोपर्यंत गुरुद्वारामधील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बाहेर काढले जात नाही आणि दरवाजे उघडले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही हलणार नाही,” असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. सुमारे 3 ते 4 तास हे आंदोलन सुरू होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी, प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने संतप्त जमाव पोलीस ठाण्यातून थेट गुरुद्वाराच्या दिशेने रवाना झाला.
दोन भाविक गंभीर जखमी
हा जमाव गुरुद्वाराजवळ पोहोचताच दोन्ही गट समोरासमोर आले. यावेळी गुरुद्वाराच्या आतून आंदोलकांवर दगडफेक सुरू झाली. धक्कादायक म्हणजे, जमावाला पांगवण्यासाठी गुरुद्वाराच्या आतून फटाके करुन धूर सोडण्यात आल्याने परिसरात घबराट पसरली. लाठ्या-काठ्यांनी झालेल्या या हल्ल्यात दोन भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. तसेच गुरुद्वाराच्या आत लपून बसलेल्या बाबा रणवीर सिंह व त्यांच्या सात साथीदारांना ताब्यात घेतले.
धुळे शहरात सध्या शांतता असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे. गुरुद्वारा परिसरात राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर सायबर सेलच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाईल” असा इशारा अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी दिला आहे.
