सुषमा अंधारे VS महेंद्र थोरवे, ‘भर रस्त्यात मारहाण करा, गुंडागर्दी करा, तुमच्या सगळ्यांची कृत्य बदलणार नाही’
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक मारहाणीचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली. याचवेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक टीका-टिप्पणी झाली.

शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाकरे गटाकडून संबंधित व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत मारहाण करणारी व्यक्ती ही शिवसेना शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. पण महेंद्र थोरवे यांनी हा आरोप फेटाळला आहे. पण मारहाण करणारा आणि पीडित व्यक्ती हे दोघे आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं महेंद्र थोरवे यांनी मान्य केलं आहे. दोन्ही कार्यकर्त्यांमधील आपापसातील वादामुळे ही घटना घडल्याचं थोरवे यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी दोषी असणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं थोरवे यांनी स्पष्ट केलं. महेंद्र थोरवे आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनांवर ‘टीव्ही 9 मराठी’वर प्रतिक्रिया दिली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद होताना दिसला.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा मारहाणीचा व्हिडीओ हा नेरळचा आहे. एक व्यक्ती चारचाकी गाडीत बसलेल्या व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण करतो. मारहाण करणारा व्यक्ती पीडित व्यक्तीला अतिशय अमानुषपणे मारहाण करतो. गाडीत पीडित व्यक्तीची पत्नी आणि मुलंदेखील आहेत. ते मारहाण करणाऱ्याला अक्षरश: याचना करताना दिसत आहेत. पण तरीही मारहाण करणाऱ्याला पाझर फुटताना दिसत नाही. संबंधित घटना ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ हा काळजाचा ठोका चुकवणारा आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देत असताना महेंद्र थोरवे आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक टोले आणि टोमणे बघायला मिळाले.
महेंद्र थोरवे VS सुषमा अंधारे, काय-काय घडलं?
“मारहाण करणारी व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. ही चुकीची बातमी आहे. ठाकरे गटाने चुकीची माहिती पसरवली आहे. ठाकरे गटाने आम्हाला बदनाम करण्यासाठी हे कृत्य केलेलं आहे. आमचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. पण ते दोन्ही लोकं आमचेच आहेत. त्यांच्यात वाद झाले आहेत. पण माझा तो बॉडीगार्ड नाही. ते दोन्ही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहे. त्यांनी जे काही चुकीचं कृत्य केलं असेल त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया महेंद्र थोरवे यांनी दिली.
चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं हाच ठाकरे गटाचा उद्योग – थोरवे
“ठाकरे गटाला अशा चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं हाच उद्योग आता राहिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते करत आहेत. विकासाचा मुद्दा बाजूला राहिला आणि अशा चुकीच्या पद्धतीने आरोप करणं हे त्यांचं काम आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना म्हणावं, तुम्ही अडीच वर्षे सत्तेत होता, शिंदे यांनी गोर-गरीब जनतेला स्वावलंबी करण्याचं काम केलं आहे. अडीच वर्षांत तुमचं सरकार होतं तेव्हा काय कामे केली ते दाखवून द्या”, असं महेंद्र थोरवे म्हणाले.
टेबलावर उभं राहून कोणतेही लोकप्रतिनिधी…, अंधारेंचा टोला
महेंद्र थोरवे यांच्या या प्रतिक्रियेवर सुषमा अंधारे प्रतिक्रिया देतात. “मारहाण करणारी व्यक्ती कोणत्या आमदाराचा बॉडीगार्ड आहे किंवा नाही? या खोलात जाण्यात मला यश नाही. मुद्दा हा आहे की, एखाद्या माणसाला भर रस्त्यात अमानुष मारहाण करण्यापर्यंत एखाद्याची मजल जाते, तशी हिंमत होते, हे वातावरण का तयार होतं? कारण कायदा नावाची गोष्टच नाही. कायदा धाक राहिला असता तर? कायदाचा धाक असणारी लोकं अशाप्रकारे भर रस्त्यात कुणाला मारहाण करत नाहीत किंवा टेबलावर उभं राहून कोणतेही लोकप्रतिनिधी धांगडधिंगा घालत नाहीत”, असा टोला सुषमा अंधारे लगावतात. त्यावर महेंद्र थोरवे बोलायला सुरुवात करतात.
तुम्ही शिवसेनेत कधी आलात?, थोरवेंचा सवाल
“अंधारे मॅडम, तुम्ही बऱ्याचवेळा टेबलावर नाचले बोलत आहात, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही शिवसेनेत कधी आलात? हे शोधा. आम्ही शिवसैनिक आहोत. ज्या दिवशी आम्ही टेबलावर उभे राहिलो त्यादिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. आपण शिवसेनेत आलात कधी हे फक्त सांगा. तुम्ही आधी काय बोलला आहात, ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे”, असा शाब्दिक चिमटा थोरवे काढतात.
टेबलावर नाचा, भर रस्त्यात…, सुषमा अंधारेंची टीका
“बोलत राहा. हे चांगलं आहे. टेबलावर नाचा. भर रस्त्यात मारहाण करा. गुंडागर्दी करा. तुमच्या सगळ्यांची कृत्य बदलणार नाही. तुमच्या गुंडागर्दीचं समर्थन होणार नाही”, असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या. तर “आम्ही त्या घटनेचं समर्थन करत नाहीत. दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद होतच असतात. पण त्यावर कायदशीर कारवाई केली जाईल. पण आपण कारण नसताना त्याचं भांडवल करत आहात हे चुकीचं आहे”, अशी भूमिका महेंद्र थोरवे मांडतात.
