पुण्यापाठोपाठ मुंबईतही फटाक्यांबाबत मोठा निर्णय, मुंबईकरांचा दिवाळीत हिरमोड?
दिवाळीच्या तोंडावर मुंबई आणि पुण्यामध्ये फटाक्यांबाबत महत्त्वाचे निर्बंध लागू झाले आहेत. मुंबईत रस्त्यांवर फटाके विक्रीला बंदी असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

दिवाळीचा सण मोठा नाही आनंदा तोटा.. अवघ्या आठवड्याभरावर दिवाळी आली असून घराघरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. साफसफाई, फराळ, कंदील, पणत्या यांचीही खरेदी सुरू आहे. पण दिवाळी म्हटलं की सगळ्यांना सर्वात पहिले आठवतात ते फटाके.. फुलबाजी, भुईचक्र, अनार, लवंगी, सुतळीबॉम्ब असे अनेक फटाके सर्वजण आनंदाने फोडतात. मात्र याच फटक्यांबद्दल आता एक महत्वाची , मोठा अपडेट समोर आली आहे. ते म्हणजे मुंबई रस्त्यांवर फटाकेविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने हा कडक निर्णय घेतला असून विनापरवाना फटाकेविक्रीवर ‘बॅन’ लावण्यात आला आहे.
महापालिकेची कठोर कारवाई
दिवाळीच्या आधीच मुंबईतील रस्त्यांवर आणि पदपथांवर फटाकेविक्री करणाऱ्यांवर महापालिकेने कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यांवर फटाकविक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अवैध आणि धोकादायक विक्री थांबवण्यासाठी 15 ऑक्टोबर पासू ते दिवाळी संपेपर्यंत दररोज विशेष मोहीम राबवण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. रस्त्यांवर फटाके विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार, एवढंच नव्हे तर त्यांचा मालही जप्त होणार. तसेच भुयारी मार्गात आवाज आणि धूर करणाऱ्या फटाकेविक्रेत्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून अधिकृत विक्रेत्यांनाही अतिरिक्त साठा ठेवल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या वर्षी 250 किलो फटाके जप्त करण्यात आले होते. या वर्षी अंधेरी, दादर, कुर्ला भागात सर्वाधिक अनधिकृत विक्री सुरू असल्याचे दिसत असून त्यांना चाप लावण्यासाठी कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
पुण्यात फटाके विक्री आणि वाजवण्यासंबंधी कडक नियम
दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात फटाके विक्री आणि फटाके वाजवण्यासंबंधी पुणे पोलीस आयुक्तालयाने कठोर नियमावली जाहीर केली आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार, पुणे शहरात रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत फटाके वाजवण्यास पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. पण आवाज न करता केवळ रंग निर्माण करणारे फटाके फुलबाजी, अनार हे फटाक या वेळमर्यादेनंतरही लावण्यास मुभा असेल.
एवढंच नव्हे तर अॅटमबॉम्ब या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट स्फोटक फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि जवळ बाळगण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच, 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या साखळी फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापरण्यास देखील पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या परिसरापासून 100 मीटरच्या आत कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. या परिसरांना शांतता क्षेत्र म्हणजे सायलेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
