Special News| डॉ. आंबेडकरांचा काळाराम मंदिर सत्याग्रह, येवल्यातली धर्मांतर घोषणा अन् अशी झाली रक्तहीन क्रांती!

मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडरकर यांनी नाशिक जिल्ह्यातल्या येवला येथे 13 ऑक्टोबर 1935 रोजी केली आणि एका ऐतिहासिक धर्मक्रांतीला सुरुवात झाली.

Special News| डॉ. आंबेडकरांचा काळाराम मंदिर सत्याग्रह, येवल्यातली धर्मांतर घोषणा अन् अशी झाली रक्तहीन क्रांती!
डॉ. बाबासाहेबांनी येवल्यात धर्मांतरणाची घोषणा केली आणि इथली मुक्तिभूमी झाली.

नाशिकः मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडरकर यांनी नाशिक जिल्ह्यातल्या येवला येथे 13 ऑक्टोबर 1935 रोजी केली आणि एका ऐतिहासिक धर्मक्रांतीला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नाशिक जिल्ह्याचे अतूट नाते आहे. त्याचीच साक्ष इथल्या ऐतिहासिक वास्तू, स्थळे आपल्याला देतात. जगभरात रक्ताचा थेंब न सांडता झालेले धर्मांतर फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणले. विशेष म्हणजे त्यांनी इतर धर्मांऐवजी बौद्ध धर्माचा केलेला स्वीकार किती योग्य होता, हे सध्याच्या काळ काहीही न सांगता बरेच काही सांगून जातो. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी म्हणजे 13 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे विशेष वृत्त…

बाबासाहेब म्हणतात…

‘बहिष्कृत भारत’मध्ये बाबासाहेबांनी एक अग्रलेख लिहिलेला. त्यात ते म्हणतात, ‘काळाराम मंदिरासाठी सत्याग्रह करणे अपरिहार्य झाले आहे. आपण लवकरच मंदिर प्रवेशाची चळवळ हाती घेणार. जोपर्यंत हिंदू म्हणून या समाजाचे आहोत तोपर्यंत मंदिर प्रवेश हा आमचा अधिकार आहे व तो आम्ही बजावूनच दम घेऊ’. 3 मार्च 1930 रोजी बाबासाहेबांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला. या आंदोलनाचे जबाबदारी दादासाहेब गायकवाडांकडे होती. सत्याग्रहाच्या आधीच एक दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यातून 15 लोक नाशिकमध्ये दाखल झाले. त्यात अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करायचे ठरले.

3 मार्च 1930 सत्याग्रह सुरू…

डॉ. बाबासाहेबांच्या आदेशाने 3 मार्च 1930 रोजी ऐतिहासिक सत्याग्रहाला सुरुवात झाली. सत्याग्रहींच्या चार तुकड्या केलेल्या. प्रत्येक तुकडीत 150 जण. आंदोलकांनी मंदिराच्या चारही दरवाजांवर ठाण मांडले. उत्तर दरवाजावर पतितपावनदास, पूर्व दरवाजावर कचरू साळवे, दक्षिण दरवाज्यावर पांडुरंग राजभोज आणि पश्चिम दरवाज्यावर शंकरदास नारायणदास. आंदोलकांना घेऊन ठाण मांडून बसले. बाबासाहेब स्वतः सारी व्यवस्था पाहत होते. मंदिर उघडल्यास रामाचे दर्शन घ्यायचे ठरलेले. या घटनास्थळाला तत्कालीन आयुक्त घोषाळांनी भेट दिलेली. त्यांना बाबासाहेबांनी हा मानवी हक्काचा लढा असल्याचे सांगितले. काही मध्यम मार्ग निघाल्यास सत्याग्रह थांबवू, असे आश्वासन दिले. यावर घोषाळांनी हॉटसन साहेबास एक पत्र लिहिले.

घोषाळांचे हॉटसन साहेबास पत्र…

तत्कालीन आयुक्त घोषाळ आपल्या पत्रात म्हणतात, हे प्रकरण खूपच गंभीर आहे. देवळाला वेढा घातलाय. मला आंबेडकर भेटले. सत्याग्रही गाणे म्हणत आहेत. घोषणा देत आहेत. त्यात अनेक स्त्रिया आहेत. आंदोलकांचा वेष खादी असून डोक्यांवर गांधी टोप्या आहेत. सत्याग्रहात अडथळा आणणारा कुठलाही हुकूम पाळला जाणार नाही, असे आंबेडकरानी सांगितले आहे. आम्ही गेलो तेव्हा आंदोलक आमच्याशी बसून बोलले. मात्र, बाबासाहेब येताच उठले. त्यांच्या आनंदाला भरते आले. ‘गांधीजी की जय’ अशा घोषणा दिल्या. सत्याग्रहींवर सवर्णांचा बहिष्कार आहे. या चळवळीचे स्वरुप धार्मिक असण्यापेक्षा, सामाजिक व राजकीय आहे.

बाबासाहेबांवर दगडांचा वर्षाव…

हा सत्याग्रह 1935 पर्यंत चालला. यापैकी 9 एप्रिल 1930 रोजी एक भयंकर घटना घडली. हा रामनवमीचा दिवस. या ठिकाणी रथयात्रा निघणार होती. सत्याग्रही आक्रमक. पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला. संघर्ष होऊ नये म्हणून दोन्ही बाजूच्या नेत्यांनी तोडगा काढला. रथ पूर्वेच्या श्रीराम मंदिरापर्यंत आणायचा. त्यानंतर सत्याग्रहींनी आणि त्यांनी मिळून ओढावा, असे ठरलेले. पण घडले उलटच. वेळेच्या आधीच रथ ओढायला सुरुवात झाली. सत्याग्रहींना चुकवण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा त्यांनी हा रथ अडवला. संघर्षाची ठिणगी पेटली. मारामारी, दगडफेक झाली. घटनास्थळी बाबासाहेबांनी धाव घेतली. दगडांचा वर्षाव सुरू झालेला. तेव्हा भास्कर कद्रे हा भीमसैनिक मंदिरात घुसला. दगडफेकीत सापडून तो रक्तबंबाळ झालेला. त्यामुळे बेशुद्ध पडला. बाबासाहेबांनाही जखमा झाल्या.

अन् ऐतिहासिक घोषणा केली…

अन् शेवटी 13 ऑक्टोबर 1935 रोजी बाबासाहेबांनी ती ऐतिहासिक घोषणा येवला येथे केली. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. इथूनच एका ऐतिहासिक धर्मक्रांतीला सुरुवात झाली. सध्या येवल्यातल्या मुक्तिभूमीवर सामाजिक न्याय विभागाने 4.33 हेक्टर जागेत भव्यदिव्य स्मारक उभारले आहे. स्मारकात 592.44 चौरस मीटरचा विश्वभूषण स्तूप, 692.44 चौरस मीटरचा विपष्यना हॉल, प्रवेशद्वाराजवळ 12 फूट चौथऱ्यावर डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला आहे. दालनात 18 फूट उंचीची गौतम बुद्धांची मूर्ती आहे. दालनाच्या भिंतीवर बाबासाहेबांची धर्मांतरण घोषणा, मंदिर प्रवेशाची शिल्पे आहेत. परिसरात सुंदर बाग आहे. या ठिकाणी अनुयायांसाठी पाठशाळा, भिक्खू निवास, अॅम्पिथिएटर, विपश्यना हॉल, अशी अनेक कामे केली जाणार आहेत.


इतर बातम्याः

कुठे घुमला सगळ्यात पहिल्यांदा ‘जय भीम’चा नारा? निझामानं ऐनवेळी बंदी घातली, कशी पार पडली मक्रणपूरची सभा?

Dr. Ambedkar: महामानवाच्या अस्थी मराठवाड्यात फक्त एकाच ठिकाणी, औरंगाबादच्या भाऊसाहेब मोरे कुटुंबियांकडे लाखमोलाचा वारसा!

Published On - 11:33 am, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI