नाशिक जिल्ह्यातील दहा गावे भूकंपाने हादरली; दिंडोरी, सुरगाणा तालुक्यांमध्ये भीती

नाशिक जिल्ह्यातली दहा गावे भूकंपाने हादरली आहेत. त्यामुळे दिंडोरी आणि सुरगाणा तालुक्यांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नाशिक जिल्ह्यातील दहा गावे भूकंपाने हादरली; दिंडोरी, सुरगाणा तालुक्यांमध्ये भीती
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः नाशिक जिल्ह्यातली दहा गावे भूकंपाने हादरली आहेत. त्यामुळे दिंडोरी आणि सुरगाणा तालुक्यांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरगाणा परिसरात सौम्य धक्के जाणवत होते. जमिनीखालून आवाज येत होता. मात्र, शुक्रवारी सायंकाळी दिंडोरी तालुक्यातील चार ते पाच गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची नोंद नाशिक येथील मेरी भूकंपमापक केंद्रात 2.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवली आहे. अगोदरच दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात कायम धक्के जाणवत असतात. त्यामुळे नागरिक आधीच भयभीत आहेत. त्यात आता या कालच्या धक्क्यांची थेट नोंद झाल्यामुळे ही भीती वाढली आहे. महसूल विभागाने नागरिकांमधील ही भीती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

या गावांना हादरे

सुरगाणा तालुक्यातील खोकरविहीर, चिंचपाडालगत गावांमध्ये गेल्या चार दिवसांपासून धक्के बसत आहेत. मात्र, शुक्रवारी सायंकाळी 6.24 च्या सुमारास दिंडोरी तालुका भूकंपाने हादरला. तालुक्यातील मडकीजाम, वनारवाडी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते. अनेक ठिकाणी घरातील भांडे पडली. घरावरील पत्र्यांचा मोठा आवाज झाला. भिंती हादरल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सतत हादरे सुरू

सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे सतत हादरे सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 12 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास मोठा आवाज झाला. यावेळी घर हलल्यासारखे वाटले. त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता गावातल्या घरात भांड्याचा आवाज आला. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.55 वाजता सौम्य धक्का जाणवला. त्याच दिवशी दुपारी दीड वाजता आणि सायंकाळी पावणेसातच्या सुमारास जमिनीतून मोठा आवाज आला, अशी माहिती खोकरविहीर, चिंचपाडा, चिऱ्याचापाडा गावातील नागरिक देत आहेत. दोन वर्षांपूर्वी पंचक्रोशीतील चामोलीचा माळ येथील जमिनीला अडीचशे फुटापर्यंत उभी भेग पडून जमीन खचल्याचा प्रकारही झाला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवले

खोकरविहीर परिसरात भूकंपाचे धक्के सुरू असल्याचे नागिरक म्हणत आहेत. मात्र, यामध्ये अजूनही कुठेही जीवित वा वित्त हानी झालेले समोर आले नाही. हा प्रकार आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि आपत्ती कक्षाला कळवला आहे. शासन नागरिकांच्या पाठिशी आहे. त्यांनी घाबरून जावू नये. परिसरात लवकरच भूकंपमापक यंत्रणा बसवू, अशी माहिती सुरगाणाचे तहसीलदार राजेंद्र मोरे यांनी दिली आहे.

इतर बातम्याः

पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटींचे घबाड; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास

प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम दिवाळीनंतर होणार जाहीर; नाशिकमध्ये इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI