कमळाला मत द्या, एकनाथ खडसेंचे एक वाक्य अन् भर सभेत वातावरण तापलं, Video व्हायरल
महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भुसावळ येथील सभेत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी उमेदवारासाठी प्रचार करताना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला.

राज्यात सध्या नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीवरुन वातावरण तापले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भुसावळ येथील प्रचारसभेत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी प्रचार करत असताना एकनाथ खडसे यांनी भर सभेत उपस्थित कार्यकर्त्यांना थेट भाजपला मतदान करा असं आवाहन केलं. हे ऐकून सभेत क्षणभर गोंधळ निर्माण झाला होता. याचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या भाषणादरम्यान एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उत्साहाच्या भरात एक विधान केले. येत्या दोन तारखेला मतदान आहे. मतदानाचे प्रत्येक मत कमळाच्या फुलाला असलं पाहिजे, असे एकनाथ खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या या विधानामुळे सभेत क्षणभर शांतता पसरली आणि गोंधळ निर्माण झाला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हाची म्हणजेच तुतारीची आठवण करून दिली.
कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यावर एकनाथ खडसे यांनी आपली चूक त्वरित सुधारली. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान केले पाहिजे. आपण अनेक वर्ष भाजपमध्ये काम केलं असल्यामुळे कमळाच्या चिन्हाचा उल्लेख नकळत केला गेला, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. मात्र, राष्ट्रवादीत असतानाही खडसेंच्या तोंडून भाजपला मतदान करण्याचे झालेले हे विधान राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या विरोधकांना यामुळे टीकेची संधी मिळाली असून एकनाथ खडसेंना अजूनही आपण भाजपमध्येच असल्याचा भास होतो, अशा चर्चा रंगल्या आहेत.
भुसावळमधील या ताज्या विधानामुळे एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अलीकडेच मुक्ताईनगर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी खडसे यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार सक्षम नाही असा उल्लेख केला होता. या निर्णयामुळे खडसे यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना फायदा मिळवून दिला असल्याची चर्चा मुक्ताईनगरमध्ये रंगली आहे.
शिवसेना विरुद्ध शिवसेना
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पारोळा नगरपालिका निवडणूक देखील सध्या चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे. पारोळा येथे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
