Pune Rave Party : रेव्ह पार्टीत त्या महिलेला कुणी पाठवलं? प्रांजल खेवलकरांच्या वकिलाच्या नव्या दाव्याने प्रचंड मोठी खळबळ; कुणावर केला सर्वात मोठा आरोप?
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी पोलिसांवर ट्रॅप लावल्याचा आरोप केला आहे. वकिलांच्या मते, कोकेन सापडलेल्या महिलेला पोलिसांनीच पाठवले होते. ही कारवाई बनावट असल्याचा दावा केला आहे.

राज्यभरात सध्या पुण्यातील रेव्ह पार्टीचं प्रकरण खूपच गाजत आहे. रविवारी या पार्टीत गांजासदृश पदार्थ, दारूच्या बाटल्या सापडल्या असा दावा पोलिसांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना या रेव्ह पार्टीतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्यासह 5 पुरूष 2 महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं व त्यांची ससून रुग्णालयात तपासणी देखील करण्यात आली होती ही पार्टी एका हॉटेलमधील फ्लॅटमध्ये ‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली सुरू होती. पोलिसांनी त्यांना मिळालेल्या टीपच्या आधारावर ही कारवाई केली. एकनाथ खडसे यांचे जावई सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. जावयाचं नाव रेव्ह पार्टीत आल्यावर एकनाथ खडसे तसेच रोहिणी खडसे हे दोघंही मैदानात उतरले असून काल रोहिणी खडसे यांनी तर पतीसाठी वकिलाचा कोटही अंगावर चढवत कोर्टात उपस्थिती लावली.
आता या रेव्ह पार्टी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी प्रांजल खेवलकर यांना ट्रॅप लावून अडकवलं असा मोठा दावा वकिलांनी केला आहे. ज्या महिलेच्या पर्समध्ये कोकेन सापडलं ती महिला पोलिसांनीच पाठवली असा दावा वकिलांनी केला आहे. एवढंच नव्हे तर पोलिसांची कारवाई ही बनावट असून याप्रकरणी उच्च न्यायलयात धाव घेणार असल्याचेही खेवलकर यांचे वकील म्हणाले.
काय म्हणाले वकील ?
विजयसिंह ठोंबरे पाटील हे खेवलकर यांचे वकील म्हणून काम सांभाळत असून त्यांनी टीव्ही9 मराठीशी बातचीत केली. ज्या महिलेच्या पर्समध्ये कोकेन आढळलं ती महिला पोलिसांनीच तिकडे ( रेव्ह पार्टीच्या ठिकाणी) पाठवली असा संशय आम्हाला येऊ लागला आहे. कारण तो व्हिडीओ जर पाहिला तर त्या व्हिडीओमध्ये असं दिसतं की पोलिस आले की ती महिला सरळरळ सरळ, काहीच न सांगता त्यांना पाकिट काढून देत्ये. याचा अर्थ काय ? समजा जर असं एखाद्या महिलेकडे खरंच कोकेन असतं तर तिने ते लपवण्याचा, बॅग लपवण्याचा प्रयत्न केला असता. ही बॅग माझी नाही असं ती म्हणाली असती. इथे मात्र ती महिला स्वत:च अतिशय इमानदारपणे पर्समध्ये काढून देते, ते सगळ्या व्हिडीओ शूटिंगमध्ये दिसतंय. त्यामुळे सदर प्रकार पाहून सर्वांना समजतंय की हा संशयियत, बनावट आणि खोटा प्रकार केला आहे, असा दावा खेवलकर याचे वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केला
तसेच प्रांजल खेवलकरांवरील कारवाई बनावच असून खेवलकरांना अडकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप करत या खोट्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांच्या वकिलांनी सांगितलं. हे सगळं प्रकरण प्रांजल केवळकरांवर ट्रॅप लावून केलं असल्याचा आरोपही खेवलकरांच्या वकिलांनी केला.
