मोठी बातमी! वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने, नेमकं काय घडलं?
आज नारळी पौर्णिमा आहे. यानिमित्त समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे वरळी कोळीवाड्यात पोहोचले होते.

आज नारळी पौर्णिमा आहे. यानिमित्त ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे वरळी कोळीवाड्यात पोहोचले आहेत. नारळी पौर्णिमा निमित्त कोळी बांधव समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ वाहतात. नारळीच्या बत्तेरी जेट्टी येथे आदित्य ठाकरे कोळी बांधव यांच्यासोबत नारळ समुद्राला वाहणार आहेत. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नारळी पौर्णिमेच्या निमित्त बत्तेरी जेट्टी येथे कोळी बांधवांसोबत नारळ समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी आहे होते. यावेळी हे दोन्ही नेते आमने-सामने आल्याचे चित्र आहे.
शिंदे ठाकरे आमने-सामने
यावेळी दोन्ही नेत्यांचे कोळी बांधवांनी स्वागत केले. यानंतर हे दोन्ही नेते एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांसोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ शिंदे या ठिकाणावरून निघत असताना आदित्य ठाकरे त्यांच्यासमोर आले. जेव्हा हे दोन्ही नेते एकमेकांसमोरून जात होते, तेव्हा त्या दोघांमध्ये अवघ्या काही फुटांचे अंतर होते. यावेळी या दोन्ही नेत्यांना पाहण्यासाठी कोळी बांधवांची मोठी गर्दी जमली होती.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, ‘आज नारळी पौर्णिमेचा उत्साह आहे, सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. सर्व कोळी बांधव, लाडक्या बहिणी एकत्र येऊन आज हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. कारण हा सण कोळी बांधवांसाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे. या कोळीवाड्याचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे अशी भूमिका राज्य सरकारची आहे’ असं विधानही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी निवडणुकीत खोट्या मतदारांद्वारे कसे मतदान होत आहे त्याला भाजप आणि निवडणूक आयोगाची कशी साथ आहे, याचे प्रेझेंटेशन केले. या बैठकीचा एक फोटो समोर आला आहे. यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे खूप मागे, शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसत होते. यावरून एकनाथ शिंदेंना त्यांच्यावर टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंच्या रांगेत बसण्याबद्दल विचारणा करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, “जे स्वाभिमान गहाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात. त्यांना त्याचं काहीही वाटणार नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखवली असेल”, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते.
