एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या फेसबुक पेजला फॉलो, काय घडतंय?
महाराष्ट्राच्या राजकारणाला आता नवीन वळण येताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक पेजला फॉलो केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे यांच्या या कृतीमागे दबावतंत्र आहे का? की त्यांच्याकडून ते अनावधानाने झालंय? याबाबत चर्चा सुरु आहे. दुसरीकडे, शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटात अंतर्गत खदखद असल्याचा दावा केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा काहीच भरोसा नाही. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर एकमेकांच्या विरोधात लढलेल्या पक्षांनी भाजपच्या विरोधात एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यांच्या सरकारला महाविकास आघाडी सरकार संबोधलं जायचं. पण या सरकारला खिंडार पाडण्यात भाजपला यश आलं. कारण शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड पुकारलं. या बंडाचं खिंडार इतकं मोठं होतं की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलं. यानंतर राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अडीच वर्ष चाललं. यानंतर राज्यात नुकतंच काही दिवसांपूर्वी विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि भाजप नंबर एकचा पक्ष ठरला. भाजपला तब्बल 132 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडावा लागला.
एकनाथ शिंदे यांनी आता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदासोबत गृहमंत्रीपदही हवं होतं. पण भाजप ते देण्यात तयार नव्हतं. अर्थात खातेवाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. पण भाजप शिंदेंना गृहखातं देण्यास तयार नसल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडी सुरु असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या पेजने उद्धव ठाकरे यांच्या पेजला फॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? अशी चर्चा सुरु आहे. शिंदेंनी ठाकरेंच्या पेजला अनावधानाने फॉले केलं की महायुतीत हे शिंदेंचं दबावतंत्र आहे? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
शिंदेंच्या फेसबुक पेजवरुन कुणाकुणाला फॉलो करण्यात आलंय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक पेजला फॉलो करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन उद्धव ठाकरे यांना फॉलो करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या पेजवरुन केवळ चार जणांच्या पेजला फॉलो करण्यात आलं आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या पेजला फॉलो करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.




शंभूराज देसाई यांचा वेगळाच दावा
दुसरीकडे शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी वेगळाच दावा केला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांसोबत आमचं बोलणं झालेलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. आमदारांच्या चर्चेतून ठाकरे गटात खदखद असल्याचं लक्षात येतं, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. “खासदार संजय राऊत यांना इशारा आहे की, त्यांनी आता थोडा स्वत:ला आवर घालावा. नाहीतर राहिलीले सर्व उबाठाची काय अवस्था होईल, हे कुणी सांगू शकणार नाही. अंतर्गत खदखद खूप आहे आणि ती केवळ संजय राऊतांमुळे आहे”, असंही शंभूराज देसाई म्हणाले आहेत.