सिंदूर उडालेल्या दगडाने…, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
भारत-पाकिस्तान सामन्यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, या सामन्याला शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध करण्यात आला आहे, यावरून आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भारत आणि पाकिस्तान सामन्याला आजा शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. पहलगाम हल्ला झाल्यानंतर दोनच महिन्यात पाकिस्तानसोबत सामना खेळणं योग्य आहे का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला होता, त्यावर प्रतिक्रिया देताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
जेव्हा पहलगामचा हल्ला झाला, आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम पाकिस्तानने केलं, त्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याला मोकळीक दिली, त्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याचं काम केलं. मी फक्त एवढेच सांगतो, सिंदूर उडालेल्या दगडाने खऱ्या अर्थाने सिंदूरच्या पुड्या बांधण्याच्या काम करू नये, सिंदूरची काळजी करू नये, असा खोचक टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर आपल्या सैन्यानं त्याचा बदला घेतला, मात्र काहींनी त्याच लष्करावर संशय निर्माण करण्याचं काम केलं. पाकिस्तान हा भारताचा शत्रूच आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर कोणीही शंका घेऊ शकत नाही, कारण बाळासाहेबांनी हिंदुत्त्वाचा पुकार करत गर्वसे कहो हम हिंदू है, चा नारा दिला होता, ती हिंमत बाळासाहेबांनी दाखवली होती, असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे, आज राज्यभरात शिवेसना ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं, यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं, या सामन्यावरून विरोधकांनी सरकारच्या कोंडीचा प्रयत्न केला.
