शिवसेनेत या, मंत्रीपदही देतो…; शरद पवारांच्या आमदाराला भरत गोगावलेंनी थेट ऑफरच देऊन टाकली
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांना शिवसेनेत येण्याची आणि मंत्रिपदाची खुली ऑफर दिली. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. आता या ऑफरवर अभिजीत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

सागर सुरवसे, टीव्ही९ मराठी प्रतिनिधी : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांना शिवसेनेत येण्याची आणि मंत्रिपद देण्याची खुली ऑफर दिली. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आलेल्या गोगावले यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. आता या ऑफरवर आमदार अभिजीत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.
गोगावलेंनी काय दिली ऑफर?
जेव्हा आपण संकटात असतो त्यावेळी देव उभा राहतो, पण ज्यावेळी देव अडचणीत आला त्यावेळी अभिजीत पाटील यांचे वंशज उभे राहिल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले. त्याबद्दल आबा तुम्हाला धन्यवाद. जर आमच्याकडे येण झालं तर मंत्रीपदही देऊ शकतो हे जमलेल्या जनतेसमोर सांगू शकतो असे गोगावले म्हणाले. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या.
शिंदे गटाच्या ऑफरवर अभिजीत पाटील काय म्हणाले?
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असताना पंढरपुरात आले होते. त्यावेळी आपण मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी थांबलो होतो, असं अभिजीत पाटील यांनी स्पष्ट केलं. राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांची भेट घेणं हा प्रोटोकॉल आहे. पंढरपुरातील 65 एकर परिसर माढा मतदारसंघात येतो. त्यामुळे मतदारसंघातील अडचणी त्यांच्यासमोर मांडणं आवश्यक होतं, असं ते म्हणाले.
‘मी आमदार नसतानाही शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. आता ते उपमुख्यमंत्री असतानाही आलो. विधिमंडळात प्रश्न मांडतोच, पण मतदारसंघात आल्यानंतरही प्रश्न मांडले पाहिजेत,’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्यामुळे शिंदे गटाच्या ऑफरवर त्यांनी थेट पक्षप्रवेशाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
रोहित पवारांवरील नाराजीही बोलून दाखवली
यावेळी अभिजीत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्याबाबतही भाष्य केलं. माझ्या मतदारसंघात एखादी गोष्ट करताना आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे. आमच्यात समन्वयाचा अभाव असल्याचं लक्षात आल्याने आपण जाहीरपणे भूमिका मांडली, असं त्यांनी सांगितलं. रोहित पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर टीका करण्याइतका मी मोठा नाही, असंही ते म्हणाले.
