2014 पूर्वीचा भारत अन् 2014 नंतरचा भारत! दोन फोटो शेअर करत भाजपच्या रविंद्र चव्हाणांनी राहुल गांधींना आरसाच दाखवला
Ravindra Chavan On Rahul Gandhi: नरेंद्र मोदींच्या जागतिक नेतृत्वावर राहुल गांधींनी टीका केली आहे. रविंद्र चव्हाणांनी दोन आंतरराष्ट्रीय फोटोंमधून प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, भारत आंतरराष्ट्रीय घडामोडींमधील आपली भूमिका गमावत असून आता तो एक बाजूचा खेळाडू बनला आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि भारताच्या जागतिक स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
‘2014 पूर्वीचा भारत’ आणि ‘2014 नंतरचा भारत’ यातील फरक दोन आंतरराष्ट्रीय छायाचित्रांच्या माध्यमातून अधोरेखित करत त्यांनी राहुल गांधी यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एकत्रित छायाचित्राच्या आधारे राहुल गांधी यांनी भारताच्या जागतिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.
त्याला प्रत्युत्तर म्हणून रविंद्र चव्हाण यांनी 2011 मध्ये फ्रान्स येथे झालेल्या G20 परिषदेत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मागील रांगेत उभे असल्याचे तर 2024 मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या G20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रस्थानी असल्याचे छायाचित्र शेअर केले. ‘2014 पूर्वीचा भारत’ आणि ‘2014 नंतरचा भारत’ अशी शीर्षके देत त्यांनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताच्या जागतिक प्रतिमेत झालेला बदल अधोरेखित केला आहे.
दूध का दूध, पानी का पानी
पण…. इतका सुस्पष्ट बदलही काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी यांना दिसेना ! कारण…
भूक सहन होईनाशी झाली की आपल्याला त्यापुढे काहीही दिसेनासं होतं. सत्तेच्या भुकेपुढे राहुलजींचीही हीच अवस्था झालीय. पण राहुलजी, या भुकेपोटी जर भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा ! कोणताही सच्चा भारतीय हे कधीही खपवून घेणार नाही !
#RahulGandhiExposed
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) November 20, 2026
‘दूध का दूध, पानी का पानी’ असे म्हणत रविंद्र चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या टीकेतील आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीतील विसंगतीवर बोट ठेवले. भूक सहन होईनाशी झाली की आपल्याला त्यापुढे काहीही दिसेनासं होतं. सत्तेच्या भुकेपुढे राहुलजींचीही हीच अवस्था झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. तसेच, या भुकेपोटी जर भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा! कोणताही सच्चा भारतीय हे कधीही खपवून घेणार नाही! असे ठणकावत त्यांनी राहुल गांधी यांना स्पष्ट इशाराही दिला.
जागतिक व्यासपीठावरील भारताच्या स्थानावरून राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना दोन कालखंडांतील छायाचित्रांची तुलना करत रविंद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजकीय सत्तासंघर्षापलीकडे देशाची जागतिक प्रतिष्ठा महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर थेट प्रहार केला आहे.
