मुंबई, ठाणे कोणाचे ? कोणाचा डंका वाजणार ?
महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजितदादा गटासाठी अस्तित्वाची लढाई आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण या भागातच शिवसेना वाढली. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाची दोन शकले झाल्याने दोन्ही पक्षांसाठी ही विधानसभा निवडणूक कसोटीची ठरणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका दिवाळीनंतर होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता सत्ताधारी महायुतीने अनेक लोकप्रिय घोषणांची बरसात केलेली आहे. महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष फोडल्यानंतर ही विधानसभा निवडणूक होत असल्याने या निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकात महायुतीला फटका बसल्याने महायुतीने लाडकी बहीण सारख्या लोकप्रिय योजना आणल्या आहेत. महायुतीतील तिन्ही गट भाजपा, शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार गट या योजनेचे श्रेय घेऊन प्रचाराला लागले आहेत. तर मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने या योजनांवर टीका करीत मतांसाठी ही योजना असल्याचे म्हटले आहे.
मुंबई, ठाणे आणि कल्याण कोणाचे ?
महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांपैकी एकट्या मुंबईत 36 आणि ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदार संघ आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मुंबई, ठाणे आणि कल्याण तसेच कोकणातील जास्तीत जास्त जागा लढविण्यासाठी तयार आहेत. परंतू महायुती आणि महाविकास आघाडीत शिंदे आणि ठाकरे यांच्या वाट्याला किती जागा सुटतात आणि त्यापैकी किती निवडून येतात यावर पुढील राजकारण अवलंबून राहणार आहे.
मोठा भाऊ कोण ?
महाविकास आघाडीत ठाकरे शिवसेना गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटा तसेच कॉंग्रेस यांची मोट बांधली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची मुंबईत विशेष ताकद नाही. परंतू कॉंग्रेसची व्होट बॅंक मुंबईत असल्याने कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात जागांवरुन अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे कोण कोणाला किती जागा सोडतो आणि किती जागा लढतो यावर विधानसभेत कोण मोठा भाऊ ठरणार याचा फैसला होऊन त्याचा मुख्यमंत्री बसणार असल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेनेला हव्यात या जागा
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील 36 विधानसभा जागांपैकी खालील जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांमध्ये दहीसर, वरळी, वांद्रे पूर्व, दिंडोशी, कालिना, अंधेरी पूर्व,विक्रोळी, वडाळा, कुर्ला, जोगेश्वरी, गोरेगाव, चारकोप, दादर-माहिम, चांदीवली, भांडुप,वर्सोवा,शिवडी, चेंबूर, घाटकोपर, मागाठाणे आणि अणूशक्ती नगर या जागांवर ठाकरे गटाने उमेदवार देखील निश्चित केलेले आहेत. कॉंग्रेस देखील मुंबईतील जागांवर आपला हक्क सांगत आहे.
कॉंग्रेसने मागितलेल्या जागा
कॉंग्रेसने धारावी, चांदीवली, मुंबादेवी, मालाड पश्चिम, सायन – कोळीवाडा, वांद्रे पश्चिम, घाटकोपर पश्चिम, कुर्ला, जोगेश्वरी पूर्व, मलबार हिल, माहिम, बोरीवली आणि चारकोप विधानसभा जागांवर लढण्याची तयारी केली आहे.तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील काही जागा मागू शकते.
साल 2019 चे विधानसभेचे आकडे –
साल 2019 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपा-अखंड शिवसेना यांच्या युतीने एकत्र निवडणूक लढली होती. त्यावेळी 30 जागा निवडून आल्या होत्या. शिवसेनेला मुंबईतील 19 जागांवर विजय मिळाला होता. तर कॉंग्रेसने मुंबईतील 28 जागांवर निवडणूक लढवून केवळ 4 जागांवरच विजय मिळविला होता. एकसंघ एनसीपीने केवळ एका जागेवर विजय मिळविला होता. तर एक जागा समाजवादी पार्टीने जिंकली होती. याआधी साल 2014 मध्ये देखील जवळपास असाच निकाल लागला होता.
मुंबईतील राजकीय सारीपाटावर शिवसेना आणि भाजपा आणि कॉंग्रेसमध्येच लढाई असते. येथे राष्ट्रवादीचा फारसा वाव नाही. राष्ट्रवादीचा मूळ आधार पश्चिम महाराष्ट्रच राहीला आहे. मराठवाडा आणि प. महाराष्ट्रातील परंपरागत ग्रामीण मतदार राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहीलेला आहे. कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या मुंबईत काटे की टक्कर होत आली आहे. परंतू साल 2019 नंतर कॉंग्रेसच्या जागा घटल्या आहेत. तसेच अडीच वर्षांपूर्वी तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांचे दोन-दोन गट झाले आहे.तरीही उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघापैकी तीन लोकसभा मतदार संघात विजय मिळविला आहे. तर एका मतदार संघात निसटता पराभव झाला आहे.
मुंबईबाबत कोणतीही तडजोड नाही ?
उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि कॉंग्रेसशी सोयरिक केलेली असली तरी मुंबईतील जागांबाबत ते कोणतीही तडजोड करण्याच्या स्थितीत नाहीत. साल 2024 च्या लोकसभा निवडूकांत मुंबईतील सहा जागांपैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत, यात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड जिंकल्या. दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील निवडून आले. तर एका जागेवर ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर एकनाथ शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्याविरुध्द फेर मोजणीत केवळ 48 मतांनी हरले होते. कॉंग्रेसने आपल्या कोट्यातली दोन जागांपैकी एका जागेवर विजय मिळविला. शिंदे सेना आणि भाजपा प्रत्येकी एक जागा जिंकले. या लोकसभेतील विजयामुळे उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे.साल 2019 मध्ये जिंकलेल्या 19 जागांना न सोडण्याचा चंग उद्धव ठाकरे यांनी मांडला आहे.एवढंच नाही तर साल 2019 मध्ये ज्या 26 जागांवर निवडणूक लढली होती. त्या जागांवर ठाकरे सेना नशीब आजमावू पाहत आहे. परंतू कॉंग्रेस यासाठी राजी नाही. मुंबईत कॉंग्रेसची देखील मते असल्याने कॉंग्रेसने मुंबईतील जागांसाठी 50-50 चा फॉर्म्युला ठेवलेला आहे. अशात कॉंग्रेसने मुंबईतील 36 पैकी 18 जागांवर निवडणूक लढण्याचा हट्ट कायम ठेवला आहे.
मुंबईत आवाज कोणाचा ?
साल 2024 च्या विधानसभा निवडूकांत मुंबईतील 36 जागांसाठी लढाई होण्याची चिन्हे आहेत. यामागे मुंबईत जो जादा विधानसभा जागा जिंकले त्यालाच मुंबईतील महानगर पालिकेचे जादा जागा मिळण्यासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. शिवसेनेला कोणत्याही परिस्थिती मुंबई महानगर पालिकेतील सत्ता सोडायची नाही. मुंबईतील जागांसाठी कॉंग्रेस आणि शिवसेनेते घमासान होत असल्याने आता कोणाची बाजू जागावाटपात वरचढ ठरते त्यावर मुंबईत कोणाचा आवाज घुमणार हे ठरणार आहे.
लोकसभा निकालांचा फायदा होणार का ?
लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडण्याच्या फटका भाजपाला बसल्याचे म्हटले जाते. लोकसभा निवडणूकीत मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला सहानुभूती दाखविली. तसेच राष्ट्रवादीला देखील फायदा झाला. परंतू सर्वाधिक फायदा आर्श्चयकारकपणे कॉंग्रेसला झाला आहे. महाविकास आघाडीला सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातून मिळाले आहेत. आणि महायुतीला सर्वात जास्त फटका मराठवाड्यात फटका बसला आहे.मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनामुळे भाजपाच्या अनेक मातब्बर पडले. 2024 लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघापैकी महाविकास आघाडीने 30 मतदार संघ जिंकले तर महायुतीला 17 लोकसभा जागांवर समाधान मानावे लागले आहे. महाराष्ट्रात नुकत्याच सर्वेक्षणानूसार महाविकास आघाडीला पुन्हा सहानुभूती मिळालेली असली तरी महायुतीत भाजपा हा पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येणार असल्याचे आकडे सांगत आहेत.