विधानसभा अध्यक्षांना प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांचे दोन सवाल; पहिलाच प्रश्न…
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आधी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना डेडलाईन दिल्याने हा मुद्दा चर्चेत आला होता. आता थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. राहुल नार्वेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना या विषयाला हात घातला. त्यावर प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी दोन प्रश्न उपस्थित केले आहेत.

योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 12 नोव्हेंबर 2023 : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही. या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने दोनदा फटकारले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांना या मुद्द्यावर निर्णय घ्यायला डेडलाईनही दिली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नार्वेकर यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं असतानाच त्यांनी आज महत्त्वाची विधाने केली आहेत. त्यावरून प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी दोन सवाल केले आहेत. नार्वेकर यांच्यासााठी हे दोन सवाल अडचणीचे ठरू शकतात, असं सांगितलं जात आहे.
नार्वेकर काय म्हणाले होते?
राहुल नार्वेकर यांनी आज मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी जनतेला न्याय मिळेल असा निर्णय़ व्हायला हवा. तसा निर्णय दिला जाईल. लोकशाहीत बहुमताला सर्वाधिक महत्त्व असतं. जनतेला आणि कायद्याला अपेक्षित निर्णय देणार आहे, असं राहुल नार्वेकर म्हणाले होते.
सरोदे काय म्हणाले?
नार्वेकर यांची ही प्रतिक्रिया आल्यानंतर त्यावर असीम सरोदे यांनी दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल नार्वेकरांना कोर्टाने मोठी जबाबदारी दिली आहे ती त्यांना कायद्याच्या चौकटीतच राहून पार पाडावी लागणार आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर कायदेशीर बाबच महत्त्वाची ठरेल, कारण बहुमत असेल तेच बरोबर आहे का? असे विचारल्यावर लोकशाही ही पूर्णपणे बहुमताच्या आधारावर चालते, असं त्यांनी म्हटलंय. लोकशाही बहुमताच्या आधारावर चालते हे मान्य आहे. परंतु जे अल्पमतात आहे ते देखील बरोबर असू शकतात, असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.
लोकांच्या अपेक्षेनूसार म्हणजे ?
लोकांच्या अपेक्षा नुसार निर्णय देणार असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. लोकांच्या अपेक्षेनुसार म्हणजे नक्की कुणाच्या अपेक्षेनुसार ? ते लोक कोण आहेत?, असा सवाल असीम सरोदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच लोकशाहीत अल्पसंख्याक बरोबर असतील तर त्यांचं मत ग्राह्य धरलं जाणार की नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. राहुल नार्वेकर हे कायद्याच्या चौकटीत आणि संविधानाचा आदर करणारा निर्णय देतील अशी अपेक्षा आपण करू, असंही त्यांनी म्हटलं आहे.
