दिवाळी अंधारात… मदतही गायब… थेट तहसीलदाराची गाडीच फोडली; शेतकऱ्याचा आसूड कडाडला !
Nanded News: राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने 31 हजारे कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी घोषणा केली होती. मात्र काही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे आता एका शेतकऱ्याने तहसीलदाराचे वाहन फोडल्याचे समोर आले आहे.

राज्यात झालेल्या मुसळदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने 31 हजारे कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी घोषणा केली होती. मात्र काही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही, तसेच काही शेतकऱ्यांना कमी मदत मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनामध्ये नाराजीचे वातावरण आहे. अशातच आता नांदेडमधील मुदखेडच्या तहसीलदाराची गाडी शेतकऱ्यांनी फोडली असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जय जवान जय किसान अशी घोषणाबाजी
समोर आलेल्या माहितीनुसार अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळे जय जवान जय किसान अशी घोषणाबाजी करत साईनाथ खानसोळे या शेतकऱ्याने मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांचे शासकीय वाहन फोडले आहे. वाहन फोडताना खानसोळे हे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. शेतकरी आत्महत्या करून अधिकारी मलिदा खातात. शेतकऱ्यांचे पैसे पडले नाहीत, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. एखाद्या गावात जाऊन विचारलं का पैसे पडले का? सर्वसामान्य शेतकरी जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा तुमच्या पगारी होतात, तुम्हाला या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे. काय व्हायचं ते होऊ द्या आज तहसीलदाराची गाडी फोडली, उद्या आमदाराची फोडतो. फासावर चढायला तयार आहे. मी भिणार नाही, फाशी झाली तरी मी भगतसिंगासारखा फाशी घ्यायला तयार आहे अशी प्रतिक्रिया साईनाथ खानसोळे यांनी दिली आहे.
कायदा हातात घेणं उचित नाही – तहसीलदार
या घटनेवर बोलताना तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी म्हटले की, ‘साईनाथ मारुती खानसोळे यांना यापूर्वी अनुदान देण्यात आले आहे. त्यांच्या अकाउंटला 6 हजार 200 रुपये 90 रुपये जमा झाले आहेत. खानसोळे यांना एक जमीन सामाईक मध्ये होते व एक वैयक्तिक होती. बासरी मध्ये गट नंबर 371 आणि गट नंबर 382 मध्ये जमीन आहे. पण त्यांची टोटल जमीन ही एक हेक्टरच्या पण खाली होती. आपण पंचनामा करून शासकीय दरानुसार त्यांना मदत दिली आहे. मुदखेड तालुक्यातील 23 हजार 800 शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. 20 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी शासनाची मदत मिळाली आहे. इतर शेतकऱ्यांनाही लवकरात मदत जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. कायदा हातात घेणं उचित नाही.
दिवाळी गेली, पण मदत मिळाली नाही…
अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी महिनोमहिने प्रतीक्षा करूनही शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने त्यांचा संयम सुटला आणि मुदखेड तालुक्यात तहसीलदारांची गाडी फोडली गेली.
कायदा कोणीही हातात घेऊ नये, ही भूमिका योग्यच आहे. पण जेव्हा संवेदनाहीन सरकार… pic.twitter.com/8Lr6TZvdmc
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 27, 2025
शेतकऱ्यांचा संयम सुटला – वडेट्टीवार
याबाबत बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी महिनोमहिने प्रतीक्षा करूनही शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने त्यांचा संयम सुटला आणि मुदखेड तालुक्यात तहसीलदारांची गाडी फोडली गेली. कायदा कोणीही हातात घेऊ नये, ही भूमिका योग्यच आहे. पण जेव्हा संवेदनाहीन सरकार शेतकऱ्यांच्या व्यथा समजूनच घेणार नसेल त्यांच्याकडे “पर्याय काय?” हाही प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे.
फक्त बोलघेवडे आश्वासनं देऊन चालणार नाही, तर ठोस मदत आणि तात्काळ कृती याची शेतकऱ्यांना नितांत गरज आहे. नाहीतर, आपल्या हक्कासाठी झगडणारा बळीराजा निराशेच्या गर्तेत जाईल आणि सत्ताधाऱ्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल.
