अजित पवारांच्या गटाला धक्का, आमदाराकडून पालकमंत्रिपदाचा राजीनामा, कारणही सांगितले
गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राजीनामा दिला आहे. मात्र, यामागे राजकीय नाराजी असल्याची चर्चा आहे, विशेषतः प्रफुल्ल पटेल यांच्या विधानानंतर. अजित पवार गटातील पाटील यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे होते, मात्र ते न मिळाल्यानेही नाराजी होती, असे म्हटले जाते.

राज्यात एकीकडे निवडणुकांचे वारे वाहत असताना दुसरीकडे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि विशेषत अजित पवार गटात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. बाबासाहेब पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा देत असल्याची माहिती दिली आहे. मात्र बाबासाहेब पाटील यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
बाबासाहेब पाटील यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. यावेळी बोलताना बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा देण्याचे कारण सांगितले. गोंदिया खूप लांब आहे आणि डॉक्टरांनी मला थोडा प्रवास टाळायला सांगितला आहे. मी रागात राजीनामा दिला नाही. गैरसोय होत होती म्हणून राजीनामा दिला, असे बाबासाहेब पाटील म्हणाले.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे
यावेळी बाबासाहेब पाटील यांनी एक खंतही व्यक्त केली. मला लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही तशी इच्छा होती. मात्र राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे त्यामुळे ते मिळाले नाही, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान बाबासाहेब पाटील यांच्या राजीनाम्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक विधान केले होते. यावेळी त्यांनी विदर्भातील स्वत:च्या पालकमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका करत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पालकमंत्री फक्त सहलीला येतात, असे विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले होते.
नाराजीमुळे निर्माण झालेल्या दबावातून पद सोडले
पटेल यांच्या या टीकेनंतर लगेचच बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाटील यांचा राजीनामा केवळ प्रकृतीच्या कारणास्तव आहे की नाराजीमुळे निर्माण झालेल्या दबावातून त्यांनी पद सोडले, याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत. बाबासाहेब पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदार आहेत.
बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडण्यामागे प्रकृतीचे कारण असेल तरी राजकीय वर्तुळात प्रफुल्ल पटेल यांची नाराजी हेच प्रमुख कारण मानले जात आहे. या राजीनाम्यामुळे विदर्भातील राजकारणाबद्दल चर्चा रंगली आहे.
