
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जस जशी जवळ येत आहे. तसा तसा मित्र पक्षातील बेबनाव दिसून येत आहे. कोकणताही काही ठिकाणी वाद दिसून येत आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता दिसत आहेत. तर काही ठिकाणी महायुतीत बेबनाव दिसत आहे. आरेला कारे करण्याची भाषा करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद संपलेले नाही. पालकमंत्री पदावरून भांडण सुरू असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उट्टे काढण्याची भाषा दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यातच मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याला प्रफुल्ल पटेल यांनी असे उत्तर दिले आहे.
असे वक्तव्य सिरीयस घ्यायचे नसते
उदय सामंत यांनी मित्रपक्षांना धमकी वजा इशाराच दिलाय.आपल्याला महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आहे, पण कोणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवू.असा इशारा सामंत यांनी मित्र पक्षांना दिला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या वक्तव्यांना सिरीयस घ्यायचे नसते.. स्थानिक स्तरावर आपले वर्चस्व दाखविण्याकरिता असे वक्तव्य करावे लागतात. त्याच्यामुळे त्याला इतका सिरीयस घ्यायचं नसतं असेही प्रफुल पटेल म्हणाले.
ठाकरे बंधूंना शुभेच्छा
महाविकास आघाडी मध्ये राज ठाकरे यांच्या एंट्री संदर्भात संजय राऊत यांनी महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभेपूर्तीच आहे. ठाकरे बंधूंची युती पक्की आहे. ज्यांना सोबत यायचं त्यांचे स्वागत आहे. असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता ठाकरे बंधू एकत्र येतील तर त्यांना शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. तर महाविकास आघाडीच्या भवितव्यावर त्यांनी भाष्य केले.
त्यांनी परत महाविकास आघाडी तयार करावी कितीही एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा सफाया झाला आहे. त्याच्यामुळे राज्यातील जनता ही समजदार असून कोणाची युती झाली तरी काही फरक पडणार नाही असे वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केले.