मालवणीतील अतिक्रमणावर सरकारचा हातोडा, नऊ हजार चौ.मी.अतिक्रमणमुक्त
पहिल्या टप्प्यातील कारवाई बाबत मंत्री लोढा यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच या कारवाईत अधिकाऱ्यांना आवश्यक ते सहाय्य शासन करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

मालाड आणि मालवणी परिसरातील सरकारी जागेवर केलेल्या अतिक्रमणांवर मुंबई पालिका आणि इतर सरकारी यंत्रणांचा हातोडा पडला आहे. या मोहिमेत पहिल्या टप्प्यात तब्बल नऊ हजार चौरस मीटर सरकारी जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आहे. या ठिकाणी बांग्लादेशी आणि रोहिंग्यांनी अतिक्रमण केल्याचे गाऱ्हाणे नागरिकांनी मुंबई उपनगर सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घातले होते. त्यानंतर ही तोडक कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई उपनगर सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मंत्रालयातील दालनात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केलेल्याचे मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
मालाड आणि मालवणीतील सरकारी जागेवर केलेला कब्जा आणि अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनासंदर्भात मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जनता दरबारात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते..या प्रकरणात टास्क फोर्स ही नेमण्यात आला होता.या कारवाईबाबतचा आढावा घेण्यासाठी मंत्री लोढा यांनी १७ ऑक्टोबर, २७ ऑक्टोबर आणि ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा केला. या बैठकीत सबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी, मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि म्हाडाचे अधिकारीही उपस्थित होते.
टास्क फोर्सने केलेल्या कारवाईबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही पहिल्या टप्प्याची कारवाई आहे. या कारवाईत मालवणी परिसरातील नऊ हजार चौरस मीटरचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. पुढच्या टप्प्यात कांदळवन आणि इतर ठिकाणच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात येणार आहे.
अतिक्रमण यापुढे खपवून घेतले जाणार नाही
सरकारी जमिनीवरील अतिक्रमण यापुढे खपवून घेतले जाणार नाही. ज्या ठिकाणी अंगणवाड्या होत्या, त्याठिकाणी अंगणवाड्या उभारण्यासाठी निधी दिला जाईल, असेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले. तसेच अतिक्रमण हटवलेल्या जागेवर प्रशासनाने त्वरित संरक्षक भिंत उभारून पुन्हा येथे अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सूचनाही मंत्री लोढा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
बांगलादेशी, रोहिंग्यांची घुसखोरी
मालवणी परिसरात आयोजित जनता दरबारात स्थानिक नागरिकांनी मालाड-मालवणीतील अनधिकृत बांधकामाचा पाढाच वाचला होता.स्थानिक आमदार अनधिकृत बांधकामाला खतपाणी घालत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. केवळ अनधिकृत बांधकामच नाही तर, तिथे बांगलादेशी, रोहिंग्यांची घुसखोरीही मोठ्या प्रमाणात असल्याचे नागरिकांनी सांगितले होते. त्याचबरोबर त्या भागात गुंडगिरीचे प्रमाण वाढत असून जीर्ण झालेल्या अंगणवाड्यावर ही समाजकंटकांनी कब्जा केल्याचे नागरिकांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सरकारी जमीन ताब्यात घेणे आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे तातडीचे आदेश त्यावेळी मंत्री लोढा यांनी दिले होते.
