राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते “मोदीज मिशन ” पुस्तकाचे प्रकाशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आणखी एक पुस्तक लिहिण्यात आलं आहे, ‘मोदीज मिशन’ असं या पुस्तकाचं नाव आहे, वकील बर्जिस देसाई हे या पुस्तकाचे लेखक असून, रुपा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आणखी एक पुस्तक लिहिण्यात आलं आहे, ‘मोदीज मिशन’ असं या पुस्तकाचं नाव आहे, वकील बर्जिस देसाई हे या पुस्तकाचे लेखक असून, रुपा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवन प्रवास रेखटण्यात आला आहे. वडनगरमधील बालपण ते पंतप्रधान होण्यापर्यंतची कहाणी या पुस्तकात आहे, आज महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, हे पुस्तक इतर पुस्तकांपेक्षा वेगळं आहे. कारण एका पत्रकार, लेखक आणि वकिलाने हे पुस्तक लिहिलं आहे. पत्रकार सहसा लोकांबद्दल चांगलं लिहीत नाहीत आणि वकील पुराव्याशिवाय लिहीत नाहीत, मात्र हे दोन्ही अंग असलेल्या व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक आहे, त्यामुळे हे पुस्तक इतर पुस्तकांपेक्षा वेगळं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देसाई यांनी पंतप्रधान मोदींच्या विविध पौलूंना उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. वयाच्या 9 व्या वर्षी कौटुंबिक परिस्थितीची जाणीव असणं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आधी रामकृष्ण मिशन मग हिमालय आणि मग संघ असा त्यांनी प्रवास केला. देशाची सेवा करायची असेल तर संन्यास न घेता संन्यस्त राहून सेवा करायचं ठरवलं आणि संघाचे काम सुरू केले. मोदी सक्रिय राजकारणात कसे आले? याचाही या पुस्तकात उल्लेख आहे, असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्यपाल आचार्य देवव्रत या पुस्तकाबद्दल बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री व इतरांनी या पुस्तकाबाबत विस्तृतपणे मांडणी केली आहे. जन्म आणि मृत्यू दरम्यानचा कालावधी जो लोकांना समर्पित करतो त्याचं आयुष्य सार्थकी असतं. पंतप्रधान मोदींनी जे आदर्श आपल्या आयुष्यात स्थापित केलेत त्याचा विचार केला तर लक्षात येईल ही बाब सहज सोपी नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आयुष्य म्हणजे एका महापुरुषाचे लक्षण आहे. नवे रस्ते बनवून लोकांना त्या मार्गावर चालण्याची क्षमता असलेलं व्यक्तिमत्त्व महापुरुषांचं असतं, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महापुरुष आहेत, असं यावेळी राज्यपाल यांनी म्हटलं आहे.
