रविवार विशेष : कोरोनाची नियमावली काय? राज्यात अद्यापही नेमकं काय सुरु, काय बंद?

रविवार विशेष : कोरोनाची नियमावली काय? राज्यात अद्यापही नेमकं काय सुरु, काय बंद?

कोरोना विषाणूचा नवा अवतार, पाश्चिमात्य देशातील कोरोनाची दुसरी लाट या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन 31 जानेवारी 2020 पर्यंत वाढवला आहे. मात्र, तरीदेखील मिशन बिगीन अंतर्गत काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे (Guidelines of lockdown)

चेतन पाटील

| Edited By: Nupur Chilkulwar

Jan 03, 2021 | 11:23 AM

मुंबई : कोरोना या भयावह आणि भीषण संकटाने आख्खं जग पालटून टाकलं. लाखो लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. जगभरातील कोट्यवधी लोकांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी अनेकजण बरे देखील झाले. मात्र, काही लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला. पाश्चिमात्य देशांमध्ये अजूनही कोरानाचा हाहा:कार सुरुच आहे. या कोरोना संकटापासून बचाव व्हावा, देशातील जास्तीत जास्त लोक यापासून सुरक्षित राहावे यासाठी भारतातही इतर देशांसारखं लॉकडाऊन (Guidelines of lockdown) घोषित करण्यात आला. आंततराष्ट्रीय विमान सेवांपासून ते छोट्या-मोठ्या दुकानांपर्यंत सर्व काही बंद घोषित करण्यात आलं.

देशातील लॉकडाऊनच्या (Guidelines of lockdown) सुरुवातीच्या दोन टप्प्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद होतं. त्यानंतर हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली. हळूहळू स्थलांतरित नागरिकांसाठी ट्रेन सुरु झाल्या. त्यानंतर महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत अत्यावश्यक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरु करण्यात आली. हळूहळू ऑड-ईव्हन फॉर्म्यू्ल्याने बाराजपेठा, दुकानं सुरु करण्यास परवानगी मिळाली. लोकांना ठरावीक वेळेत घराबाहेर पडण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर पुढच्या काही टप्प्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले.

कोरोनावर जसंजसं नियंत्रण मिळवण्यात यश येत गेलं तसतसं लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं. तिथे कोरोना विषाणूच्या नव्या प्रजातीची लोकांना बाथा होत असल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे कोरोना विषाणूची ही नवी प्रजाती जास्त धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं. या कोरोनाचा भारतात शिरकाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलली. केंद्र सरकारने ब्रिटनला जाणारे किंवा तिथून येणारी विमान सेवा तातडीने बंद केली. मात्र, गेल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2020 मध्ये जवळपास 33 हजार पेक्षा जास्त नागरिक ब्रिटनहून भारतातील विविध विमानतळावर दाखल झाले. त्यामुळे चिंता वाढली आहे.

कोरोनाच्या नव्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने पुन्हा कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली. राज्य सरकारने तर राज्यभरातील मोठ्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यूची घोषणा केली. तर केंद्रीय गृहमंत्रालयाने ब्रिटनहून आलेल्या नागरिकांसाठी वेगळी नियमावली जारी केली. यामध्ये संबंधित व्यक्तीला एखाद्या हॉटेलमध्ये त्याच्या खर्चानेच सात दिवस क्वारंटाईन राहणं बंधनकार करण्यात आलं.

ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांसाठी नेमकी नियमावली काय?

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने मिशन बिगिनिंग अगेन अंतर्गत नवीन अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार युरोप, ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर करोनाची RTPCR टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला covid-19 च्या हॉस्पिटलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन केलं जाणार आहे. तर निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशाला सात दिवस घरामध्ये होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे.

राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार, राज्यात येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये पेड क्वारंटाईन राहावं लागेल. पाचव्या आणि सातव्या दिवशी RTPCR टेस्ट केली जाईल. प्रवाशाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास 7 दिवसात सोडणार, मात्र घरात सात दिवस क्वारंटाईन राहावं लागेल. त्याचबरोबर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कोविड हॉस्पिटलमध्ये 17 दिवस भरती राहावं लागेल, असं राज्य सरकारने नियमावलीत म्हटलं होतं.

नव्या वर्षनिमित्ताने पर्यटनास चालना, पण नियमावली काय?

नववर्ष आणि नाताळच्या सुट्ट्यांनिमित्ताने अनेक नागरिक घराबाहेर पडतात. कोरोनाची सध्याची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे पर्यटनासाठी सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. मिशन बिगीन अगेन अंतर्गत 21 डिसेंबर 2020 रोजीच्या राज्य शासनाच्या सुचनांनुसार पर्यटनस्थळे आदी सुरु करण्यास संमती दिली. पण हे करताना कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

कंटेन्मेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून नवी नियमावली जारी करण्यात आली. पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना नव्या नियमावलीची कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले आहेत.

पर्यटनस्थळांवर मास्कचा वापर, सॅनियाटयजरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आदींचे पालन करावे. गर्दी टाळण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्यास पर्यटनस्थळांचे ऑनलाईन तिकीट बुकींग करावे, पर्यटनस्थळांवर फक्त लक्षणे विरहीत पर्यटकांनाच परवानगी असेल, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले, गंभीर आजार असणाऱ्या व्यक्ती आदींनी घरीच थांबावे, पर्यटकांनी शक्यतो चलन वापरण्याचे टाळून डिजीटल पेमेंटवर भर द्यावा, अशा विविध सूचना पर्यटकांसाठी देण्यात आल्या आहेत.

पर्यटनस्थळांवर कोरोना संसर्गाला आळा घालणयासाठी योग्य ती काळजी घेण्याबाबत पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन आणि संबंधीत विविध विभागांतील प्रतिनिधींची कोव्हिड 19 टीम बनविण्यात यावी. या टीमने पर्यटनस्थळांवर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. पर्यटनस्थळांवर किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा यासंदर्भात निर्णय घ्यावा. समूहभेटी, गाईडेट टुर्स, सार्वजनिक कार्यक्रम, विशेष किंवा खाजगी कार्यक्रम आदींवर व्यवस्थापन नियंत्रण करु शकते.

पर्यटनस्थळांवरील विविध आस्थापनांचे कर्मचारी यांनीही कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घ्यावयाची आहे. तसेच अन्नपदार्थ आणि पेयांचा पुरवठा करताना घ्यावयाची काळजी याबाबतही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. संबंधित आस्थापनांनी मार्गदर्शक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

राज्यातील लॉकडाऊन 31 जानेवारीपर्यंत

दरम्यान, कोरोना विषाणूचा नवा अवतार, पाश्चिमात्य देशातील कोरोनाची दुसरी लाट या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन 31 जानेवारी 2020 पर्यंत वाढवला आहे. मात्र, मिशन बिगीन अंतर्गत 30 सप्टेंबरह आणि 14 ऑक्टोबरला निर्बंध शिथिल करत ज्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या होत्या. त्याच गाईडलाईन्स लागू राहतील, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, या गाईडलाईन्समध्ये अद्यापही मुंबई लोकल चालू करण्याबाबत परवानगी देण्यात आलेली नाही.

राज्यात काय सुरु, काय बंद?

मेट्रो रेल शॉपिंग मॉल हॉटेल-रेस्टॉरन्ट सेवा धार्मिक स्थळं योगा आणि प्रशिक्षण संस्था जीम सिनेमागृहं एन्टरटेनमेंट पार्क

राज्यांच्या स्तरावर आढावा घेऊन काय सुरु करण्याची परवानगी?

शाळा प्रशिक्षण संस्था संशोधनासाठीचे राज्याचे आणि खासगी विद्यापीठं 100 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी देणे निर्बंधांसह सुरु करण्याची परवानगी

आंतरराष्ट्रीय विमान प्रवास खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेसह सिनेमागृहं 50 टक्के आसनक्षमतेसह आणि 200 पेक्षा व्यक्तींच्या राजकीय सभा, सामाजिक, सांसकृतिक किंवा क्रिडा क्षेत्रातील कार्यक्रम

मुंबईतील शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार नोव्हेंबर महिन्यातच शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. राज्य सरकारने स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहता शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. राज्य सरकारने शाळा सुरु करण्याआधी सर्व शिक्षकांना कोरोना चाचणी करणं बंधनकारक केलं. त्यानंतर अनेक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील आणखी काही दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर राज्य सरकारने खबरदारी म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने देखील मुंबई शहरातील सर्व खासगी आणि सरकारी शाला 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या नियमावलीबाबत किंवा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी मास्कचा वापरल करणं अत्यंत जरुरीचं आहे. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे देखील गरजेचं आहे. वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, असे सर्व नियम पाळणं आवश्यक आहे.

हेही वाचा :  Corona Vaccine Dry Run | नव्या वर्षात सर्व राज्यात कोरोना लसीची ड्राय रन, केंद्राचा मोठा निर्णय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें