खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाची ताकद वाढेल, माजी मंत्री गुलाबराव देवकरांना विश्वास

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचं राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे नेते गुलाबराव देवकर यांनी स्वागत केलं आहे.

  • रवी गोरे, टीव्ही 9 मराठी, जळगाव
  • Published On - 16:58 PM, 21 Oct 2020

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा राज्यभर सुरु होती. त्या चर्चेला अखेर पूर्ण विराम मिळाला असून शुक्रवारी एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे नेते गुलाबराव देवकर यांनी स्वागत केलं आहे. (Gulabrao Devkar On Eknath Khadase Join NCP)

“एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यावर स्थानिक नेत्यांवर त्याचा काहीही नकारात्मक परिणाम होणार नाही. कारण नाथाभाऊ सर्व समाज घटकाला सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. भाजपला त्यांनी जसं घरोघरी पोहोचवलं तसं राष्ट्रवादीमध्ये देखील ते जोमाने काम करतील आणि पक्षवाढीसाठी आपलं योगदान देतील”, असा विश्वास देवकर यांनी व्यक्त केला.

“एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद वाढणार आहे. एकनाथ खडसेंना भाजपने सत्तेपासून दूर ठेवल्यामुळे तसंच त्यांच्यावर भाजपने अन्याय  केल्याने त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला”, असं देवकर म्हणाले.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाथाभाऊंच्या पक्षात येण्याने आनंदी आहेत. त्यांच्या रुपाने पक्षाला धडाडीचा नेता मिळाला आहे. ते झोकून देऊन काम करतील. तसंच जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील, असं ते म्हणाले.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा जिल्हाध्यक्षांनी देखील एकनाथ खडसे यांच्या बंगल्यासमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी खडसे समर्थक भाजपचे आजी माजी नगरसेवक याठिकाणी उपस्थित होते.

खडसेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे

खडसेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे देण्याची मालिका सुरु झाली आहे. तसेच खडसेंच्या या निर्णयानंतर मुक्ताईनगरमध्ये दिवाळीपूर्वी फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली.

जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शिवराज सिंग पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. माझ्याकडे जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्षपद आहे. मी भाजपचा 2000 पासूनचा सक्रीय कार्यकर्ता आहे. आमचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने वेळोवेळी केलेल्या अन्यायाला कंटाळून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असे शिवराज पाटील यांनी सांगितले.

(Gulabrao Devkar On Eknath Khadase Join NCP)

संबंधित बातम्या :

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

पक्ष सोडू नये म्हणून चंद्रकांत पाटलांशिवाय कुणाचाही फोन नाही; खडसेंचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर खासदार सूनबाई रक्षा खडसे म्हणतात…

एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रकाश मेहतांचा निर्धार