जर भाजपसोबत युती नाही झाली तर…, गुलाबराव पाटलांनी बोलून दाखवली ती भीती, चर्चेला उधाण
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर आता गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र या निवडणुका कशा लढवल्या जाणार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये या निवडणुका लढवल्या जाणार की? काही पक्ष स्वबळाचा नारा देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपबाबत मोठं वक्तव्य केलं आहे, पाटील यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले पाटील?
भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करते, अशी सूचक टीका राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, युती झाली नाही तर कार्यकर्ते मरतील, भाजप शंभर जागा लढेल तिथे आम्ही आमच्या ताकतीनुसार पन्नास जागा तरी लढूच, पण असे करू नका यामुळे कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडली आहे.
युती न झाल्यास कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होईल, ते “मरून जातील,” त्यामुळे भाजपाने कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी, लोकसभा विधानसभेला कार्यकर्ता काम करतो, त्यामुळे दोन-चार जागा इकडे तिकडे करा, पण कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी हीच निवडणूक असते, असं गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. लोक आता हुशार झाले आहेत. पहिल्यांदा निवडून येणं सोपं असतं, पण सलग तीन-चार वेळा निवडून येणारा नेता खरा असतो. शिवसेनेचं नुकसान संजय राऊत या एकट्या माणसामुळे झालं, अशी टीकाही त्यांनी यावेळी राऊतांवर केली.
दरम्यान दुसरीकडे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. सर्व निवडणुका या महायुती म्हणूनच लढवणार आहोत, मात्र जिथे आपला चांगला उमेदवार असेल तिथे त्याचा बळी जाऊ देणार नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढत होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
