सदावर्ते यांची गाडी फोडली, जामिनावर बाहेर येताच मंगेश साबळे यांचा पुन्हा इशारा, म्हणाले? ‘तर किंमत चुकवावी लागणार…’
सत्कार, मानसन्मान हे आरक्षणासाठी सुरू असलेला आंदोलनाचे इव्हेंट करता कामा नये. राजकीय भाषणांवर आणि राजकीय घोषणांवर आमचा विश्वास राहिलेला नाही. शांततेने लढा, समाजासाठी झटत राहा, तसं जमत नसेल तर जे आम्ही करतोय ते करा. मात्र आत्महत्या करू नका.

मुंबई : 26 ऑक्टोबर 2023 | मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन गाड्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत या तरुणांनी गाड्या फोडल्या. पोलिसांनी याप्रकरणी मंगेश साबळे आणि त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले. या कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने मंगेश साबळे याच्यासह अन्य कार्यकर्त्यांची 5 हजारांच्या जातमुचलका जामिनावर सुटका केली. यानंतर मंगेश साबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा डोंबिवली येथे मराठा समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
मंगेश साबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या सत्काराला मराठी समाजाच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जोरदार घोषणाबाजी करत मोठा हार गळ्यात टाकून त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना मंगेश साबळे म्हणाले, सत्कार, मानसन्मान हे आरक्षणासाठी सुरू असलेला आंदोलनाचे इव्हेंट करता कामा नये. मराठ्यांना माजूरे, माजलेले म्हणणं, त्यांना मी आरक्षण मिळवून देणार नाही असं म्हणणं, मराठ्यांच्या सभांना जत्रा म्हणने हे मराठा समाजाच्या अस्मितेला खिजवत आहेत. मराठा समाज हा अपमान सहन करनार नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचे आम्ही स्वागत करतो. मात्र. मुख्यमंत्र्यांनी 40 दिवसांपूर्वी शब्द दिला होता. ते म्हणाले होते 40 दिवसात जीआर काढतो. तीस दिवसात आरक्षण देतो. मात्र, तसे कुठेही झालेलं नाही. म्हणून राजकीय भाषणांवर आणि राजकीय घोषणांवर आमचा विश्वास राहिलेला नाही. आम्हाला आता ठोस उत्तर या ठिकाणी हवंय. आधी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हवंय अशी मागणीही मंगेस साबळे यांनी केली.
मराठा समाजाच्या तरुणांना आवाहन करताना ते म्हणाले, ‘शांततेने लढा, समाजासाठी झटत राहा, तसं जमत नसेल तर जे आम्ही करतोय ते करा. मात्र आत्महत्या करू नका. स्वातंत्र्य फक्त उपोषण करून मिळालेलं नाही. स्वातंत्र्य भगतसिंग, राजगुरू यांच्यामुळे सुद्धा मिळालेय. आम्ही शांततेत आंदोलन करतोय. सरकारने तत्काळ आरक्षण द्यावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. आत्महत्या करू नका शांततेने लढा. नाही तर आम्ही जे करतोय ते करा. समाजाच्या विरोधात बोलणारे सदावर्ते यांना कोणताही इशारा नाही. मात्र. समाजाचे माथे भडकावण्याचे जो काम करेल त्याची किंमत त्याला चुकवावी लागणार, असा इशारा त्यांनी दिला.
