
Harshwardhan Sapkal : काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारी विधाने केली होती. याच विधानांचा आधार घेत त्यांच्यावर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांशी करताना त्यांना लाज वाटली नाही का? असा सवाल करत सपकाळ यांनी माफी मागावी अशी मागणी केली. राज्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्याविरोधात आंदोलनेही केली. असे असतानाच आता वाढता विरोध लक्षात घेता सपकाळ यांनी टिपू सुलतानबाबतचे आपले शब्द मागे घेतले आहेत.
सपकाळ यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना, “भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मला धमक्या दिल्या आहेत. मला घाबरवण्यासाठी या धमक्या दिल्या आहेत. मी त्यांच्याविरोधात बोलून नये म्हणून त्यांचा हा केवीलवाणा प्रयत्न आहे. मी अशा धमक्यांना भीक घालत नाही. कुठल्याही परिस्थितीत आमची भाजपाच्या विरोधातील भूमिका कधीही कमी होणार नाही. किंबहुना अमेरिकेसोबतचा करार, एपस्टिन फाईल्स यामुळे भाजपाला भयगंड झालेला आहे,” अशी त्यांनी भाजपावर टीका केली.
तसेच, फडणवीस यांचे प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यांच्यावर मोठे आरोप होत आहेत. आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देत राहू. ते अंगावर आले तर शिंगावर कसं घ्यायचं हे आम्हाला माहिती आहे. हिंसा आमचा मार्ग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच या सर्व प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल भाजपाकडून वारंवार चुकीची वक्तव्ये करण्यात आली. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो असे सांगत माझ्या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावनवा दुखवाल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असेही ते म्हणाले. टिपू सुलतानप्रकरणी शब्द मागे घेत असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य नावाचा विचार दिलेला आहे. याच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले. टिपू सुलतान हे भारताचे भूमीपूत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष म्हणून पाहिले पाहिजे, अशी टिप्पणीही त्यांनी केली होती. त्यांच्या याच विधानामुळे वाद निर्माण झाला होता.