रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कडक सुरक्षा, लावले बॅरिकेट्स; कारण काय?
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातील शिवभक्तांची रायगडावर मोठी गर्दी झाली आहे. पोलिसांची मोठी सुरक्षा येथे तैनात करण्यात आली आहे.

रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं आलं आहे. याआधी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्याची मागणी केली होती. या पत्रात त्यांनी नमूद केलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर पराक्रमी राजाच्या समाधीच्या शेजारी प्राण्याची समाधी असणं ही इतिहास आणि संस्कृती दोन्हीच्या दृष्टीने चुकीची बाब आहे. त्यामुळे ही समाधी हटवण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली होती.
समाधी परिसरात बंदोबस्त तैनात
याच पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही सज्ज झालेली असून, 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समाधी परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली कडक सुरक्षा येथे अभी करण्यात येत आहे. सोबतच ड्रोनच्या सहाय्याने रायगड किल्ल्याच्या परिसरात देखरेख सुरू आहे.
प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली
दुसरीकडे 6 जून रोजी रायगडावर होणाऱ्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ला आणि परिसर सज्ज झाला आहे. राज्यभरातून लाखो शिवप्रेमी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार असल्यामुळे यंदाची गर्दी विक्रमी असण्याची शक्यता आहे. ही गर्दी सुरळीतपणे हाताळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी कोंझर आणि पाचाड येथे मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, तिथून एस.टी. बसद्वारे रायगडकडे जाण्याची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी वैद्यकीय पथकं तैनात
गडावर पिण्याच्या पाण्याची व वैद्यकीय मदतीची सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी वैद्यकीय पथकं तैनात आहेत. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या नेतृत्त्वात चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवभक्त आदल्या दिवशीच किल्ले रायगडवर दखल झाले आहेत. यामुळे किल्ले रायगडवर गर्दीचा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे.
