हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला पाहिजे पिस्तूल, आत्मदहनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?
भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. त्यानंतर आता त्यांनी बंदुकीचा परवाना हवाय, अशी मागणी केलीय.

Bhagyashree Hotel : भाग्यश्री हॉटेल हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालंय. सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या हॉटेलचे मालक नागेश मडके सगळीकडे चर्चेचा विषय आहेत. त्यांच्या हॉटेलमध्ये नेहमी गर्दी झालेली पाहायला मिळते. दरम्यान, आता त्यांना मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आता त्यांनी पोलीस प्रशासनाला थेट आत्महदहनाचा इशार दिलाय. तसेच स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाना हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.
भाग्यश्री हॉटेलच्या मालकाला बेदम मारहाण
दोन दिवसांपूर्वी धाराशीव शहरातील ‘रील स्टार’ भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करून त्यांना चालत्या गाडीतून बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली होती. मारहाण झाल्यानंतर त्यांना चालताही येत नसल्याचे काही व्हिडीओ इन्स्टाग्राम तसेच इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झाले होते. मारहाण होऊन दोन दिवस उलटूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही, असा दावा नागेश मडके यांनी केला आहे.
बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठीच…
मडके यांचा आरोप आहे की, बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठीच गुन्हा दाखल करू नका, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ही बाब धक्कादायक असून कायद्याच्या रक्षणासाठी असलेल्या यंत्रणेकडूनच अन्याय होतोय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या गंभीर प्रकरणावर पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
वारंवार शहर पोलीस ठाण्यात पाठपुरावा करूनही गुन्हा नोंदवला जात नसल्याचा आरोप मडके यांनी केला आहे. तसेच अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत पोलिसांकडून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी म्हटलंय.
‘गुन्हा नोंदवा नाहीतर आत्मदहन करतो’ – नागेश मडके
या प्रकरणी पोलिसांनी लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा आणि चौकशी करावी अशी मागणी मडके यांनी केलीय. या मागणीला घेऊन त्यांनी कुटुंबीय व बॉडीगार्डसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली. “माझ्यावर अन्याय झालाय. जर गुन्हा दाखल केला नाही, तर आत्मदहनाशिवाय पर्याय नाही,” असा थेट इशाराच त्यांनी दिलाय.त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
