Kalyan News : सोन्यापेक्षा माणुसकी मोठी ! कल्याणमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा, कचऱ्यातून परत केला ‘सोन्याचा हार’!
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आणि सुमित कंपनीच्या या सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे आणि माणुसकीचे कौतुक सध्या सर्वत्र होत आहे. या कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले की, प्रामाणिकपणा हा कुठल्याही सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान असतो!

आजच्या आधुनिक जगात, टेक्नॉलॉजीच्या युगात, माणूसकी हरवत चालली आहे, अशी खंत आपण नेहमी ऐकतो. एखादा अपघात किंवा चुकीचं काही घ़डलं तर त्यातील पीडितांच्या मदतीला न जाता काही जण बघ्याची भूमिका घेतात तर काही महभाग तो सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतात. त्यामुळे माणसा माणसा कधी होशील माणूस? असं म्हणायची वेळ बऱ्याचदा येते.
पण जग फक्त काळ्या, करड्या रंगाने भरलेलं नाही, तर तिथे पांढरा शुभ्र, दयेचा, माणुसकीचा, ओलाव्याचा रंगही अद्याप कायम असल्याचे काही घटनांमधून दिसून येते आणि माणुसकीवरचा डळमळीत झालेला विश्वास पुन्हा दृढ होतो. जगात अजूनही प्रामाणिकपणा, माणुसकी हे गुण आहेत हे दर्शवणाऱ्या घटना घडत असतात आणि कल्याणमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेनेन तर या सर्व गुणांवरचा विश्वास आणखीनच दृढ होईल हे निश्चित.. काय घडलं ? तुम्हीही वाचा..
कल्याणमधील सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा
कल्याण मधील आजची बातमी माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करणारी आहे. जिथे सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, त्याच काळात कल्याणमधून एक अत्यंत प्रेरणादायक आणि प्रामाणिकपणाचं उदाहरण समोर आलं आहे. कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, कचऱ्यात चुकून फेकलेला सोन्याचा महागडा हार कोणताही मोह न ठेवता थेट संबंधित महिलेला परत केल्याचे समोर आले आहे.
चूकून केरात टाकला सोन्याच हार
कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका महिलेने तिचा सोन्याचा हार हा नजरचुकीने घरातील कचऱ्याच्या पिशवीत टाकला. त्यानंतर तो सोन्याचा हार कचरा संकलन करणाऱ्या गाडीत गेला. मात्र काही वेळाने त्या महिलेला आपली चूक लक्षात आल्याने तिला मोठा धक्का बसला. कारण तोपर्यंत कचरा गाडी तर निघून गेली होती. मात्र तिने धीर सोडला नाही आणि तातडीने याबद्दलची माहिती केडीएमसी अधिकाऱ्यांना दिली. त्यानतंर कर्मचाऱ्यांनीही प्रामाणिकपणे तो हार शोधून तिला परतही केला.
असा मिळाला हार
महिलेची तक्रार तातडीने सुमित कंपनीच्या 4 जे प्रभागाचे अधिकारी समीर खाडे आणि केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव यांच्यापर्यंत पोहोचली. या अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने हालचाली सुरू केल्या.ज्या भागातून कचरा संकलन करण्यात आला होता, त्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. गोळा झालेला कचरा कचोरे टेकडीवरील इंटरकटींग केंद्रावर पाठवण्यात येत होता. तेव्हा त्या कचरा गाडीला लगेचच तिथे नेण्याचे निर्देश देण्यात आले.
त्यानंतर जिचा हार गहाळ झाला ती महिला, तिचे कुटुंबीय, शेजारी आणि सुमित कंपनीच्या अधिकाऱ्यांसमक्ष या गाडीतील कचरा वेगळा काढण्यात आला आणइ या मेहनती आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलं. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अखेर तो सोन्याचा हार यशस्वीपणे शोधून काढण्यात आला! या कर्मचाऱ्यांनी सोन्याच्या मोहाचा कणभरही विचार न करता, तो महागडा हार तातडीने त्या महिलेच्या स्वाधीन केला. हार सुखरूप परत मिळाल्यानंतर त्या महिलेच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी या सफाई कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले.
