IMD weather forecast : महाराष्ट्रात तुफान पाऊस, पाच दिवस धोक्याचे, हवामान विभागाच्या नव्या अंदाजानं चिंता वाढली
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे, पुढील पाच दिवस हवामान विभागाकडून महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण ओडिशा तसेच उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारी भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील पाच दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांच्या काळात छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. 18 ते 20 या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर पाऊस काहीसा उघडीप देऊ शकतो, मात्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू राहील असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.
या राज्यांना हायअलर्ट
जम्मू -काश्मीरमध्ये पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, जम्मू काश्मीरसह उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांना हवामान विभागाकडून पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि आसाममध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राला पुढील चार ते पाच दिवस पाऊस चांगलाच झोडपणार आहे. विदर्भ आणि कोकणात हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर दुसरीकडे मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढल्यास पुराचा देखील धोका आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
