Induriakr Maharaj : इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यात अव्वाच्या सव्वा खर्च, अभिनेता निलेश साबळे थेटच म्हणाला, मला तर…
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यावरून निर्माण झालेल्या वादावर अनेकांनी टीका केली. महाराजांनी साधेपणाचा उपदेश केला असला तरी त्यांच्या मुलीचा साखरपुडा मात्र राजेशाही थाटात पार पडला. यामुळे ट्रोलर्सनी त्यांना धारेवर धरले. यावर वैतागलेल्या महाराजांनी कीर्तन थांबवण्याची धमकी दिली. आता एक प्रसिद्ध अभिनेत्याने यावर भाष्य करत त्याची भूमिका मांडली आहे.

आपल्या कीर्तनातून समाजप्रबोध करणारे इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) हे लोकांना साधेपणाने लग्न करण्याचा सल्ला देतात. कर्ज काढू नका, वारेमाप पैसे खर्च करून लग्न करू नका अशी शिकवण देणारे इंदुरीकर महाराज त्यांच्या आयुष्यात मात्र याचे पालन करू शकले नाहीत. लाडकी लेक ज्ञानेश्वरी हिचा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साखरपुडा झाला, तेव्हा अगदी राजेशाही थाट, गाड्यांची भलीमोठ्ठी वरात, फुलं, डेकोरेशन, आलिशान हॉल, झगमग कपडे.. असा थाट होता. मात्र त्यावरून लोकांनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं. इतरांना साधेपणाची शिकवण देणाऱ्या इंदुरीकर महाराजांना घरच्या कार्यात उधळपट्टी का करावीशी वाटली, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषणा.. अशी गत त्यांची का झाली, असे सवाल विचारत लोकांनी त्यांना खूप ट्रोल केलं, त्यांच्यावर टीकाही झाली.
यामुळे वैतागलेल्या इंदुरीकर महाराजांनी ट्रोलर्सनाच सुनावलं. आम्ही कष्ट केले, संसार केला मेहनतीने, माझ्या मुलीच्या कपड्यांवर का बोलता असं म्हणत उद्वेगाने त्यांनी फेटा खाली ठेवण्याचा, कीर्तन थांबवण्याचाही इशारा दिला. एकंदरच इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यावरून प्रचंड वाद सुरू असून यात आता अनेक मान्यवर लोकांनी त्यांची बाजू मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबूकवर पोस्ट लिहीत इंदुरीकर महाराजांना फेटा खाली न ठेवण्याची विनंती केली. या पोस्टवरून त्यांनी इंदुरीकर जाहीर पाठिंबा दरव्शत विकृत लोकांच्या कमेंट्सकडे लक्ष न देण्याचाही सल्ला दिला.
तर आता एका प्रसिद्ध अभिनेत्यानेही या सर्व विषयावर भाष्य करत त्याचं मत मांडलं आहे.
चला हवा येऊ द्या फेम अभिनेता थेट बोलला
चला हवा येऊ द्या या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेला, अभिनेता, लेखक निलेश साबळे याचं नाव माहीत नाही असा माणूस विरळाच. गेली कित्येक वर्ष तो आणि इतर सहकलाकार या शोच्या माध्यमातून लोकांना हसवत, त्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. आता सध्या जरी तो या शोमध्ये दिसत नसा तरी त्याची लोकप्रियता अद्यापही कायम आहे. याच निलेश साबळेने इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यावरून झालेल्या वादावर भाष्य केलं आहे. ‘ निवृत्ती महाराजांच्या (इंदुरीकर महाराज) यांच्या मुलीचा साखरपुडा-लग्न हा अत्यंत वैयक्तिक विषय आहे, असं माझे वैयक्तिक मत आहे. मला असं वाटतं की, शेवटी प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. जो तो आपापली आपली मतं मांडत असतो, ‘ असं म्हणत या वादावर जास्त भाष्य न करता निलेशने कोणाचीही बाजू घेणं टाळत तटस्थपणे मत मांडलं.
चला हवा येऊ द्या चा हा सीझन सोडल्याचे दु:ख, वेदना मला अजिबात नाही. माझ्या सोबत भाऊ कदम आहे. मला चित्रपट काढायचा असल्यामुळे मी चला हवा येऊ द्या मधून बाहेर पडलो, असंही त्याने नमूद केलं.
तपोवन वृक्षतोडीबाबत माझा वनप्रेमींना पूर्ण पाठिंबा – सयाजी शिंदे
दरम्यान कुंभमेळ्यात साधू-महंतांच्या निवास व्यवस्थेसाठी तपोवन परिसरातील हजारो झाडे तोडण्यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी वृक्षतोडीला विरोध करत हरकतींचा वर्षाव केला. तपोवनमध्ये चिपको आंदोलन केले. आता याच मुद्यावर ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनीही भूमिका मांडली असून वृक्षतोडीचा निर्णय अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. मनुष्य जात पहिली संपणार, नंतर झाडं संपणार आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. झाडे लावण्याचा वेग जास्त हवा तोडण्याचा नव्हे असही त्यांनी नमूद केलं.
काय म्हणाले सयाजी शिंदे ?
तपोवन वृक्षतोडीबाबत अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, मला नाशिक वरून फोन येत आहेत. गिरीश महाजन हे जे वक्तव्य करत आहेत ही चेष्टा आहे का ? एक झाड तोडलं तर आम्ही दहा झाड लावू. आतापर्यंत चेक केले तर कोणत्या हायवेची झाडं लावली आहेत, असं काही हिशोब आहे का? असा सवाल त्यांनी विचारला. यामध्ये सुद्धा देशी-विदेशी झाड करणे सुरू आहेत. एक झाड तोडलं तर दहा झाड लावतो म्हणत आहात मात्र आम्ही एक झाड तोडलं तर आम्ही शंभर लोक मरायला तयार आहोत, तोडून दाखवा असं चॅलेंज देतानाच तपोवन वृक्षतोडीबाबत माझा वनप्रेमींना पूर्ण पाठिंबा आहे असंही सयाजी शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.
नागपूरला पण 4 हजार वृक्षतोड सुरू आहे. साताऱ्यातील लोणंद रस्त्याच्या कामावर देखील हीच परिस्थिती आहे. चारशे वडाची झाडे तोडली जात आहे, आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष बेफाम तोडला जातोय. जो सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा आहे . गव्हर्नमेंट याबाबत कधी जागा होणार ? याबाबत एक हजार आणि दोन हजार रुपयाची शिक्षा आहे ही काही शिक्षा आहे का? मनुष्य जात पहिली संपणार, नंतर झाड संपणार आहेत हे लक्षात घेणे गरजेचं आहे. शंभर दोनशे वर्षाची झाडे तोडताना विचार करायला हवा . झाडे लावण्याचा वेग जास्त हवा तोडण्याचा नव्हे. असे लाखो वनप्रेमी आहेत जे अशा झाडांसाठी झटत आहेत आणि हे असे आंदोलन होत असेल तर त्यांचा माझा पूर्ण पाठिंबा आहे, असंही सयाजी शिंदे यांनी सांगितलं.
