इंस्टाग्रामवर मैत्री अन् त्या दोघी थेट वाळवंटात पोहोचल्या, पुणे पोलिसांनी 3300 किलोमीटरवरून परत आणलं, नेमकं काय घडलं?
Pune Police : इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी पुण्यातील काळेपडळसारख्या सामान्य झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली थेट राजस्थानच्या वाळवंटात पोहचल्या होत्या. त्यांना पोलिसांनी परत आणले आहे.

अजिंक्य धायगुडे, पुणे : मोबाईलमुळे आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. याचे फायदेही भरपूर आहेत आणि तोटेही तितकेच आहेत. असातच आता इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी पुण्यातील काळेपडळसारख्या सामान्य झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली थेट राजस्थानच्या वाळवंटात पोहचल्या होत्या. या दोघीही गरीब कुटुंबातील आहेत. त्या अतिशय साधं आयुष्य जगायच्या. दोघांची चांगली मैत्री होती. दोघी रोज एकत्र कामाला जायच्या, रोज एकत्र घरी यायच्या. मात्र एका इंस्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्टने या दोन्ही मुलींचं आयुष्य एका क्षणात उलथून टाकलं. या दोघींच्या आयुष्यात नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.
इंस्टाग्रामवरून ‘सूत जुळलं’ आणि…
पुण्यातील दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. यातील एका मुलीची ओळख इंस्टाग्रामवरून राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सुरेश कुमार प्रजापतीशी झाली. ओळख एवढी घट्ट झाली की ती मुलगी त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती. सुरेशने तिला थेट राजस्थानला बोलावलं मुलीनंही विचार न करता जायचं ठरवलं. ही गोष्ट तिनं मैत्रिणीला सांगितली. मैत्रीणही तयार झाली. दोघींनी घरी कामाला जातेय असं सांगून थेट मुंबई आणि तिथून राजस्थान गाठलं!
घरच्यांची तारांबळ, पोलीस स्टेशनमध्ये धावपळ
रात्रभर मुली घरी न आल्याने आई–वडिलांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दिली. मुली दोघीही अल्पवयीन असल्यामुळे पोलीसांनी तात्काळ शोध सुरू केला. 29 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. मोबाइल लोकेशनचा शोध घेतला असता मुली राजस्थानमध्ये असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसानी राजस्थानकडे मोर्चा वळवला. एका मुलीचा मोबाइल मध्ये-मध्ये सुरू व्हायचा. लोकेशन दाखवायचा मारवाड जंक्शन, राजस्थान.
पोलिसांचा राजस्थानकडे मोर्चा
काळेपडळ पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक थेट राजस्थानला रवाना झालं. त्यानंतर एका मुलीला आणि सुरेश कुमार प्रजापतीला ताब्यात घेतलं. मात्र पोलिस आल्याते समजताच दुसरी मुलगी गायब झाली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच सुरेश पोपटासारखा बोलू लागला. चौकशीदरम्यान सुरेशने कबूल केलं की, इंस्टाग्रामवर त्याची फक्त एका मुलीशी ओळख होती. पण पुण्यातून दोघी आल्याने त्याला दोघींना ठेवणं शक्य नव्हतं. मग त्याने आपल्या मित्राला म्हणजे सुरेश कुमार मोहनलाल राणाभीलला दुसरी मुलगी दिली आणि ती त्याच्यासोबत राहू लागली. राजस्थानमध्ये गेलेल्या पथकाने शोध घेऊन दुसऱ्या संशयितालाही बेड्या ठोकल्या.
पुणे पोलिसांनी या मुलींचा शोध घेताना वापी – सुरत – अहमदाबाद – फालना – शिवगंज – वाकली – अंदुर – सादरी – मारवाड जंक्शन – राणी – पाली – जोधपुर असा तब्बल 3300 किमीचा प्रवास केला. दोन्ही मुलींना पोलिसांनी सुखरूप घरी आणलं. अल्पवयीन मुलींना फूस लावून राजस्थानला पळवून नेल्याबद्दल दोन्ही संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
