Reel चा नाद जीवावर बेतला, जळगावमध्ये 2 तरुणांना रेल्वेने उडवलं, जागीच मृत्यू
Jalgaon: जळगावच्या पाळधी गावातील रेल्वे रुळावर रील तयार करताना दोन तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हर्षवर्धन नन्नवरे व प्रशांत खैरनार असे 18 वर्षीय मयत दोन्ही तरुणाची नावे आहेत

सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी रील तयार करण्याचे वेड तरूणाईला लागले आहे. अशातच आता जळगावच्या पाळधी गावातील रेल्वे रुळावर रील तयार करताना दोन तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हर्षवर्धन नन्नवरे व प्रशांत खैरनार असे 18 वर्षीय मयत दोन्ही तरुणाची नावे आहेत, ते पाळधी गावात रेल्वे गेट जवळील भागात राहत होते. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रील बनवण्याच्या नादात गमवला जीव
समोर आलेल्या माहितीनुसार, पाळधी येथील रेल्वे गेटजवळ मोबाईलचा रील बनवताना अहदाबाद-हावडा या एक्सप्रेसच्या धडकेत दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही तरुण हे रेल्वे रुळावर रीलसाठी व्हिडिओ तयार करत होते, रेल्वेने हॉर्न देखील वाजवला, मात्र ते बाजूला झाले नाहीत. त्यामुळे रेल्वेने या दोघांना धडक दिली, यात दोघांचा मृत्यू झाला. पाळधी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी तरुणांचे आढळलेले दोन्ही मोबाईल देखील हस्तगत करण्यात आले आहेत.
रेल्वे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटने संदर्भात बोलताना पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी माहिती देताना म्हटले की, मोबाईल रील तयार करताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही तरुण कानात हेडफोन लावून रुळावर बसून रील करताना घटना घडल्याची माहिती गावातील काही नागरिकांकडून मिळाली आहे. मात्र याबाबत पोलीसांकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात
आज (रविवार) सकाळी 10 वाजता ही घटना घडली आहे. अपघातानंतर या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भुसावळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या अपघातातील मृत हर्षवर्धन नन्नवरे व प्रशांत खैरनार या दोघांमध्ये मामा भाच्याच नातं असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, याआधीही अनेकदा रील बनवण्यासाठी स्टंट करताना अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रील बनवण्यासाठी अनेकजण कोणत्याही थराला जात असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.
