चला मी तुम्हाला शाळेत सोडतो… विश्वासाने त्या बाईकवर बसल्या, पण तिथेच घात झाला; दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र सुन्न
जळगावच्या साक्री गावात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर गावात तणाव असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साक्री गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींची विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, साक्री गावातील दोन अल्पवयीन मुली सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. यावेळी गावातीलच एका तरुणाने ओळखीचा फायदा घेऊन त्यांना आपल्या दुचाकीवर बसवले. मुलींना वाटले की तो त्यांना शाळेत सोडत आहे, मात्र आरोपीने दुचाकी गावाबाहेरील एका निर्जन भागात असलेल्या विहिरीकडे वळवली. त्याने त्याची बाईक गावालगत असलेल्या एका विहिरीजवळ नेली. तिथे काहीही विचार न करता या नराधमाने दोन्ही मुलींना विहिरीत ढकलून दिले. ती विहीर खोल असल्याने आणि मुलींना पोहता येत नसल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
अतिरिक्त फौजफाटा तैनात
ही घटना उघडकीस येताच साक्री गावातील नागरिक आक्रमक झाले. संतापलेल्या ग्रामस्थांनी संशयित आरोपीच्या घराची तोडफोड केली. परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की, काही नागरिकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून स्वतः शिक्षा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी तणाव वाढल्याने पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला. सध्या गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोन अल्पवयीन संशयित मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत एका संशयिताने मुलींना विहिरीत ढकलल्याची कबुली दिली आहे. हा आरोपी अल्पवयीन असला तरी गुन्ह्याचे भीषण स्वरूप पाहता त्यांच्यावर सज्ञान गुन्हेगारांप्रमाणे खटला चालवण्याची मागणी पोलिसांनी केली आहे.
इन कॅमेरा शवविच्छेदन
सध्या मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत. पारदर्शकतेसाठी हे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात येणार आहे. त्यांच्या हत्येचा नेमका हेतू काय होता? यामागे काही जुना वाद होता का? या सर्व बाजूंचा तपास सध्या स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ पोलीस करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
